कोविड केअर केंद्रात सुधारणा

पाण्यासाठी स्वतंत्र कुपनलिका : स्वच्छतेवर भर

बदलापूर : बदलापूर शहरातील कोविड केअर केंद्रातील रूग्णांनी गेल्या आठवड्यात संताप व्यक्त केला होता. पालिका प्रशासनाने या समस्येवर तोडगा काढला असून जेवण वाटपात होणारी दिरंगाई दूर करण्यासाठी पालिकेने जेवण पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला केंद्रातच जेवण बनवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. पाण्यासाठी केंद्राच्या परिसरात ३ कुपनलिका खोदल्या आहेत. त्यामुळे या केंद्रात भरपूर पाणी उपलब्ध झाले असून स्वच्छतेसाठीही अतिरिक्त कर्मचारी वर्ग नियुक्त केला आहे. त्यामुळे या केंद्रात आता पूर्वी पेक्षा अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मुख्याधिकारी दीपक पुजारी स्वतः सकाळ संध्याकाळ या केंद्रात हजेरी लावून प्रत्यक्ष परिस्थितीची पहाणी करून सुधारणा करीत आहेत, मुख्याधिकारी स्वतः केंद्रावर हजर होत असल्याने सेवेत चांगली सुधारणा दिसू लागली आहे. बदलापूर शहरात बीएसयुपी गृहप्रकल्पात मे महिन्यात कोविड केअर केंद्राची सुरूवात करण्यात आली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे केंद्र सुरु करण्यात आले. सध्या या ठिकाणी २७०विलगीकरणातील तर २६० सौम्य लक्षणे असलेले रूग्ण दाखल आहेत.त्यावेळी पासूनच या केंद्राबाबत तक्रारी वाढत होत्या. गेल्या आठवड्यात येथील रूग्णांनी आपापल्या खोल्यांमधून रस्त्यावर येत उपस्थित कर्मचारी आणि अधिकारी यांना जाब विचारला होता. त्यामुळे या केंद्रात एकच गोंधळ उडाला होता. दररोज जेवण उशिराने येत असल्याने थंड जेवण जेवावे लागत असून जेवणाची गुणवत्ता आणि प्रमाण कमी असल्याची तक्रार येथे सातत्याने केली जात होती. नियमित व वेळवर स्वच्छता न होणे, वापरण्यायोग्य पाण्याची कमतरता अशा अनेक तक्रारी या केंद्रातून केल्या जात होत्या.
मुख्याधिकारी दिपक पुजारी यांनी प्रत्यक्ष या केंद्रात पाहणी करत येथील समस्या जाणून घेतल्या होत्या. उपस्थित रुग्णांशी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. चर्चा केली. मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी जेवणाच्या तक्रारी लक्षात घेता जेवणाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला केंद्राच्या परिसरातस्वयंपाक बनवण्याच्या सूचना दिल्या. आता केंद्रातच जेवण बनवल्याने रूग्णांना वेळे वर आणि चांगल्या दर्जाचे वाटप केले जात असल्याचे मुख्याधिकारी पुजारी यांनी सांगितले आहे. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राच्या परिसरात तीन कुपनलिका खोदण्याचे काम तातडीने करण्यात आले असून त्यामुळे सध्या केंद्रात मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. स्वच्छतेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येथे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असल्याचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितले आहे.
रूग्णांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून रूग्णांना दाखल करते वेळी त्यांना माझ्यासह सर्व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक दिले जातात. त्यामुळे रूग्ण कधीही आपली सूचना वा तक्रार थेट आपल्याशी संपर्क साधून करू शकतात असेदीपक पुजारी यांनी सांगितले. या कोविड केअर केंद्रातीबाबत नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या असून आणखी काही त्रुटी असल्यास त्याही वेळी पूर्ण केल्या जातील असे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितले. शहरात सहा विभाग करण्यात आले असून त्या त्या विभागात स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्या अधिकाऱ्यांना आणखी सहकारी कर्मचारी दिल्याने कोरोना नियंत्रणासाठीची मोहीम अधिक तीव्र करण्यात येत असल्याचेही दीपक पुजारी यांनी सांगितले.

 460 total views,  4 views today

Leave a Reply

Your email address will not be published.