महापालिकेच्या कारवाईत ४ दुकाने सिल

नौपाडा प्रभाग समितीतंर्गत ७५ अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

ठाणे : जांभळी नाका परिसरात अनधिकृतपणे रस्ता व्यापून व्यवसाय करणा-या जवळपास ७५ फेरीवाल्यांवर आज धडक कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. दरम्यान मुख्य बाजारपेठेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणा-या दुकानांविरूद्ध कारवाई करीत चार दुकाने सील करण्यात आली.
नौपाडा प्रभाग समितीतंर्गत जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाला मार्केट, मुख्य धान्य बाजारपेठ आणि मटन व मच्छी मार्केट येथे आज सकाळी ६ वाजलेपासून परिमंडळ उप आयुक्त संदीप माळवी, ठाणे नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमवंशी, सहाय्यक आयुक्त प्रणाली धोंगे, सहाय्यक आयुक्त पाटोळे यांनी जवळपास ५० अतिक्रमण पथकातील कर्मचा-यांच्या मदतीने या परिसरात बसलेल्या जवळपास ७५ फेरीवाल्यांवर धडक कारवाईस सुरूवात केली.
त्याचबरोबर मुख्य धान्य बाजारामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणा-या दुकानांविरूद्ध कारवाई करीत चार दुकाने सील करण्यात आली.
दरम्यान उद्यापासून हाॅटस्पाॅट वगळता इतर ठिकाणी बाजारपेठा, धान्य बाजार, भाजी मंडई येथील लाॅकडाऊन शिथील करण्यात येणार असून या ठिकाणी गर्दी होवू नये, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जावे यासाठी मध्यरात्री दोनपासून पाळत ठेवण्यासाठी ५० कर्मचा-यांची विशेष पथके तैनात करण्यात आली असून पोलिसांच्या साहाय्याने ही विशेष पथके या परिसरात गस्त घालणार आहेत.
त्याचप्रमाणे या बाजारपेठांमध्ये येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून कोणतेही वाहन आतमध्ये येणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.

 635 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.