समितीच्या आठ सदस्यांचे सभापतीना पत्र
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक तात्काळ आयोजित करण्यासंदर्भात हणमंत जगदाळे, नम्रता कोळी, विक्रांत चव्हाण, भरत चव्हाण, कृष्णा पाटील, सिराज डोंगरे, शानू पठाण, नरेश मणेरा आदी आठ सदस्यांनी समितीच्या सभापतींना पत्र लिहून सभा आयोजित करण्याची मागणी केली आहे.
वास्तविक नियमाप्रमाणे पाच स्थायी समिती सदस्यांचे पत्र दिल्यानंतर स्थायी समितीची बैठक लावणे क्रमप्राप्त होते. परंतु तशी बैठक लावण्यात आली नाही. २० मे २०२० रोजीच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये केलेल्या चर्चेप्रमाणे दर आठवड्याला मीटिंग लावण्या संबंधी चर्चा करून निर्णय घेण्यात आला. तरीसुद्धा स्थायी समितीच्या मिटींगचे आयोजन झाले नाही. सध्याच्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी आपल्या विभागात सातत्याने कार्यरत आहेत परंतु हे काम करत असताना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत व या अडचणींचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
इतर शहरांमध्ये अशा प्रकारच्या बैठकींचे आयोजन करून प्रशासन व लोकप्रतिनिधी एकत्र काम करत आहेत असे पहावयास मिळते परंतु ठाणे शहरात तसे दिसत नाही. ही बाबी लक्षात घेऊन नियमाप्रमाणे ताबडतोब स्थायी समितीची बैठक लावावी अशी विनंती या आठ सदस्यांनी केली आहे.
528 total views, 1 views today