मनसे आमदारांची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
कल्याण : कल्याण-शीळ रस्त्यावर काटई येथे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा टोल नाका आहे. सदर टोलनाक्यावर केवळ अवजड वाहनांना टोल आकारला जातो. सध्या कल्याण शिळ रस्त्याचे आणि निळजे पुलाचे काम सुरु असून हे काम पूर्ण होईपर्यंत काटई येथील टोल नाका बंद करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
सध्या कल्याण-शीळ रस्त्याचे काम सुरू असून बहुतांश ठिकाणी खोदून ठेवण्यात आला आहे. रस्ता पूर्णपणे खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यातच कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे ठाणे,नवी मुंबई, कल्याण,डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर सह इतरही प्रवाशांना कल्याण शीळ रस्त्यावरून प्रवास करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. या रस्त्यावर वाढलेली वाहनांची संख्या व काम सुरू असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी असते.
वास्तविक रस्त्याचे काम सुरू असे पर्यंत हा टोल नाका बंद करून टोल वसूल करण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा काढून टाकावी अशी मागणी राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये केली होती. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सद्यस्थिती पाहता निळजे येथील पूल धोकादायक झाल्याने अवजड वाहनांना या रस्त्यावरून बंदीच घालण्यात आली असून टोल नाक्याची व यंत्रणेची सध्या तरी गरज नाही. तसेच टोल नाका बंद झाल्यास वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होऊन, कल्याण-शीळ रस्त्याचे काम जलदगतीने होऊ शकते. त्याचप्रमाणे निळजे येथील नवीन पुलाचे काम दोन्ही बाजूने सुरू करण्यासाठी हा टोल नाका बंद करून, उभारण्यात आलेली यंत्रणा तातडीने काढून टाकण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले.
यामध्ये तातडीने लक्ष घालून प्रवाशांच्या सोयीसाठी व कल्याण-शीळ रस्त्याचे काम जलदगतीने होण्यासाठी काटई येथील टोल नाका बंद करावा. तसेच निळजे येथील नवीन पुलाचे काम दोन्ही बाजूने सुरू करणे शक्य होण्यासाठी टोल नाक्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा काढून टाकण्याचे संभंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
490 total views, 2 views today