एक वर्ष विकासकामे झाली नाही तरी चालेल : सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची मागणी
बदलापूर : लवकरात लवकर शहर कोरोनमुक्त होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, एक वर्ष विकास कामे झाली नाही तरी चालतील पण शहरातील रुग्णांना मोफत उपचार द्या आणि लोकांच्या दुवा घ्या अशा भावना सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
बदलापूर पालिकेच्या सभागृहात प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत झालेल्या चर्चेत शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे, गटनेते श्रीधर पाटील, मुकुंद भोईर, शीतल राऊत, भाजपाचे प्रवक्ते राजेंद्र घोरपडे, भाजपा शहराध्यक्ष संजय भोईर, ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संभाजी शिंदे, मनसेच्या महिला शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर, भाई जाधव आदींनी चर्चेत सहभाग घेतला. मुख्याधिकारी दीपक पुजारी, अभियंता जयेश भैरव, यांचे सह अधिकारी उपस्थित होते. या सभेत प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात सुरु करण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटरबाबत माहिती दिली. त्यावेळी गौरी हॉल येथे सुरु करण्यात येत असलेल्या कोवीड केअर सेंटरमध्ये नागरिकांना मोफत उपचार मिळावेत अशी मागणी सभेत उपस्थित राजकीय पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. सध्या लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक आर्थिक संकटात आले असून नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडणारे नसल्याने नागरिकांना मोफत उपचार व्हावेत अशी मागणी संभाजी शिंदे यांनी केली.
शहरात चाकरमानी बहुसंख्येने आहेत. वीस-पंचवीस हजार रुपये डिपॉझिट कुठून भरणार, पैसे नसतील तर रुग्णांनी मरायचं का? असा परखड सवाल शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी उपस्थित केला. शहरात एक वर्ष विकास कामे नाही झाली तरी फरक पडणार नाही, पण नागरिकांना मोफत उपचार द्या आणि नागरिकांच्या आशीर्वाद घ्या, अशी आग्रही मागणी वामन म्हात्रे यांनी केली. गौरी हॉल येथील कोविड केअर सेंटर खाजगी रुग्णालयामार्फत चालविण्यात येणार आहे. सर्व सोयीसुविधांची उभारणी रुग्णालय करणार आहे. तरीही त्याठिकाणी पालिकेसाठी काही बेडचा कोटा राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामधून आपण नागरिकांना विनामूल्य बेड उपलब्ध करून देऊ, शकतो असे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी सांगितले.
याठिकाणी फ्री बेडच्या रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार व्हावेत अशी अपेक्षा वामन म्हात्रे यांनी व्यक्त केली. पालिकेने या रुग्णांसाठी शासनाकडून उपलब्ध होणारी औषधें द्यावीत अशी सूचना भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी केली. सह्याद्री हॉल येथील क्वारंटाईन सेंटर नगर परिषदेमार्फत चालविण्यात येणार असून तिथे रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. त्याशिवाय शहरातील इतर खाजगी कोविड केअर सेंटरमध्येही नागरिकांना महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार होणार आहेत. इतरांना शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार उपचार होणार असल्याची माहितीही प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिली. गौरी हॉलमध्ये कोविड केअर सेंटरचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, ते लवकरात लवकर करण्याची मागणी श्रीधर पाटील यांनी केली. येत्या आठवड्यात हे कोविड केअर सेंटर सुरू होणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश अंकुश यांनी दिली. रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देताना कोरोनमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत नसल्यामुळे रुग्णांना होत असलेल्या त्रासाचा मुद्दा मनसेच्या महिला शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर यांनी उपस्थित केला. यावर यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन जगतसिंग गिरासे यांनी दिले.
अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने दंत महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर गौरी हॉलमध्येेेही कोविड केअर सेंटर सुरू करा अशी मागणी वामन म्हात्रे यांनी केली.अंबरनाथमध्ये खाजगी डॉक्टर रोटेशन पद्धतीने सेवा देत आहेत. आणि नागरिकांना मोफत उपचार मिळत आहेत. मग बदलापूरला का होत नाही? असा सवाल संभाजी शिंदे यांनी उपस्थित केला. यावर डॉक्टर उपलब्ध होत नसल्याचे जगतसिंग गिरासे यांनी निदर्शनास आणून दिले. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी केली. जास्त मानधन गेले तरी चालेल पण डॉक्टर व इतर कर्मचारी आले पाहिजेत, अशी भावना वामन म्हात्रे, राजेंद्र घोरपडे, संभाजी शिंदे, मुकुंद भोईर, श्रीधर पाटील, शीतल राऊत, संजय भोईर आदीनी व्यक्त केली. त्यावर नवी मुंबई महानगर पालिकेच्या धर्तीवर डॉक्टरांची पदे भरण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे जगतसिंग गिरासे यांनी स्पष्ट केले.
560 total views, 1 views today