कोविड सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांचा जीव धोक्यात

पालिकेचे अधिकारी, कर्मचारी शिक्षकांना धमकावत असून त्यांना सहकार्य करत नसल्याचा केला आरोप,आमदार संजय केळकर यांचा प्रशासनाला इशारा

ठाणे: ठाण्यात कोविड सर्वेक्षणाच्या कामात शिक्षकांना पुरेशा सुरक्षा साधन-सुविधांशिवाय जुंपण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे जीवन धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे या कामी पालिका अधिकारी-कर्मचारी यांचे सहकार्य मिळत नसून दमदाटी केली जात असल्याचा आरोप शिक्षक करत आहेत. याबाबत आमदार संजय केळकर यांनी हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत श्रीमती सावित्रीबाई थिराणी विद्यामंदीर, ब्राम्हण विद्यालय, बालविकास विद्यामंदीर या खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक कंटेनमेन्ट झोन असलेल्या गांधीनगर आणि नळपाडा भागात गेला महिनाभर कोविड रुग्ण सर्वेक्षण करत आहेत. नियुक्तीच्या वेळी काही शिक्षकांनी शारीरिक आजार असल्याचे सांगूनही त्यांना आयुक्तांचे नाव सांगून दमदाटी करत जबरदस्तीने कामास जुंपले अशी तक्रार शिक्षकांनी केली आहे. विशेष म्हणजे नियुक्त शिक्षकांना पीपीई कीट, मास्क, हातमोजे आदी सुरक्षा साधने अपुरी दिली आहेत. याबाबत विचारणा केली असता मास्क, हातमोजे पुन्हा पुन्हा धुऊन वापरा, असे सांगण्यात आले. आरोग्य विम्याचे संरक्षणही देण्यात आले नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. उलट कामात दिरंगाई केल्यास वेतन कपात करण्यात येईल, नोकरीतून बडतर्फ करण्यात येईल, अशी दमबाजीही करण्यात येत असल्याची तक्रार आमदार केळकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
ठामपा अधिकारी-कर्मचारी शिक्षकांना सहकार्य करत नसून एखाद्या भागात कोविड रुग्ण मृत्यू पावल्यास त्या भागाची माहितीही दिली जात नाही. नागरिकांचा ताप, पल्स रेट मोजणे, त्याची माहिती लिहिणे आदी कामे करताना आरोग्य विभागाचा कर्मचारीही सोबत नसतो. येथील नागरिक सामाजिक अंतर ठेवत नसून मास्कही वापरत नाहीत. अशा वातावरणात शिक्षकांना पुरेशा साधन-सुविधांशिवाय काम करावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनंत अडचणी-समस्या भेडसावत असतानाही हे शिक्षक प्रामाणिकपणे काम करत आहेत.
अशा प्रतिकूल परिस्थितीत काम करणा-या एका महिला शिक्षिकेस कोविडची लागण झाली. त्यामुळे त्यांचे कुटुंबही तणावाखाली आले आहे. विशेष म्हणजे या शिक्षिकेस दोन दिवस रुग्णालयात खाट मिळाली नाही, अशी खंतही या शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
‘अनेक समस्या असतानाही शिक्षक कोविड सर्वेक्षणात प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांना विम्याचे संरक्षणही देण्यात आलेले नाही. उलट त्यांना दमबाजी केली जात आहे. त्यामुळे शिक्षकवर्ग तणावाखाली काम करत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होणार आहे. प्रशासनातील अधिकारी अन्यायकारक वर्तन करणार असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड इशारा आमदार केळकर यांनी दिला आहे. या आधीही आयुक्तांकडे शिक्षकांच्या आणि सुविधांबाबत चर्चा केली आहे. आता पुन्हा एकदा आयुक्तांची भेट घेऊन या गंभीर प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणार असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.

 341 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.