केडीएमसीचे मनःपूर्वक आभार !

गेले काही दिवस टाटा आमंत्रा येथील व्यवस्थेबद्दल फिरणाऱ्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. तेथल्या व्यवस्थेबद्दल आलेल्या बातम्या- संदेशामुळे अत्यंत उद्विग्न झालेल्यांना वास्तव परिस्थितीचे आकलन व्हावे, यासाठी कोरोनविरुद्धची लढाई जिंकणाऱ्या मंदार आत्माराम नाटेकर यांनी व्यक्त केलेले मनोगत

कल्याण : १ जुलै २०२० रोजी सकाळी ११ वाजता आम्ही चौघेही पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट हाती पडला. माझ्या पायाखालची वाळूच सरकली. घरी जाऊन काय सांगायचे हा प्रश्न मला पडला. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून आई म्हणाली, रिपोर्ट काय आले? माझ्याने बोलवेच ना. आपण चौघेही पॉझिटिव्ह. क्षणभर सारेच गोंधळलो. पण माझी आई नेहमीप्रमाणे याही वेळी खंबीर होती. ती म्हणाली, काही टेन्शन घेऊ नका.आपण सर्वजण एकत्रच राहू या.
मी सर्वांचे रिपोर्ट घेऊन काळूनगरच्या आरोग्य केंद्रात गेलो. तेथील आरोग्य अधिकाऱ्यांना रिपोर्ट दाखवले आणि आम्ही चौघेही घरीच कोरोनटाईन होणार असल्याचे सांगितले. पण ते या गोष्टीला तयार झाले नाहीत. ते म्हणाले, एकाला आमच्या देखरेखीखाली राहावे लागेल.
मी घरी येऊन पोचेपर्यंत टाटा आमंत्राला घेऊन जाण्यासाठी अँम्ब्युलन्स इमारतीखाली येऊन उभी राहिली. मी माझी बॅग घेऊन निघालो तेव्हा आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आले होते.
अँम्ब्युलन्समध्ये बसलो तेव्हा सोसायटीतील अनेक खिडक्यातून माझ्यासाठी हात हलत होते.
तासाभरात अँम्ब्युलन्स टाटा आमंत्रा येथे येऊन उभी राहिली. माझी तपासणी झाली. पाच दिवसांच्या गोळया दिल्या आणि त्याबरोबर एक किट देण्यात आले. (खोबरेल तेल, कोलगेट, ब्रश, अंघोळीचा आणि कपड्याचा साबण). मला १६व्या मजल्यावर रूम देण्यात आली. रूम नंबर १६४९.
या खोलीत एक रूम पार्टनर अगोदरपासून होता.
रात्री ८.३० वाजता जेवण आले. त्या दिवशी झोप लागली नाही. सकाळी लवकर उठलो. प्राणायाम केला. अंघोळ करून बाहेर आलो तोच नाश्ता आला.
डॉक्टरांनी दिलेला पाच दिवसांचा गोळ्यांचा कोर्स पूर्ण केला. दररोज सकाळी ८.३० वाजता नाश्ता ( यात पोहे, उपमा, शिरा) आणि चहा. दुपारी १२.३० वाजता जेवण (वरण-भात, चपाती, भाजी), सायंकाळी ४.३० वाजता चहा आणि रात्री ८ वाजता जेवण. पिण्यासाठी मिनरल पाणी होते. संडास- बाथरूमला पुरेसे पाणी, पुरेशी वीज आणि सूर्यप्रकाश. पाण्याची तर येथे इतकी उत्तम सोय होती की अनेक जण तोंड धुणे आणि अंघोळीसुद्धा मिनरल वॉटरने करायचे.
माझा कोरोनटाईनचा कालावधी संपून मी माझ्या घरी सुखरूप आलो. आमच्या सोसायटीतील सर्व रहिवाशानी माझे स्वागत केले.
आज एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली की सोसायटी, नातेवाईक आणि घरातील मंडळीसुद्धा दूर पळतात. कानाडोळा करतात, पण या काळात निरपेक्षपणे आणि कर्तव्यनिष्ठेने अहोरात्र सेवा बजावणाऱ्या डॉक्टर, वॉर्डबॉय, आणि परिचारिका यांचा मी सदैव ऋणी राहीन. एखादवेळेस आपल्या घरातही गैरसोय होते. अशीच एखादी गैरसोय झाल्यास तिचा बाऊ न करता, कर्मचारी वर्गाचे खच्चीकरण न करता या सेवेकरी मंडळीचे मनोबल उंचावयास हवे. दररोज हजारो नागरिकांची विनामूल्य सोय करणाऱ्या केडीएमसीचे आभारच मानवयास हवेत. त्यांच्याविषयी अनुदार उदगार काढून आपल्या अकलेचे तारे तोडण्यापेक्षा या कठीण काळातील त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घ्यावयास हवी.
आज अनेक जण येथील सेवेविषयी नाके मुरडताहेत. त्यांना मी सांगू इच्छितो, खाजगी रुग्णालये आज कोविड पॉझिटिव्ह रुग्णाला दाखल करण्यासाठी लाखो रुपये मागताहेत. केडीएमसीची ही सेवा तर केवळ निशुल्क आहे. महाराष्ट्र शासन आणि प्रशासन तसेच महापालिकेचे सर्व विभागातील पदाधिकारी-कर्मचारी कल्याण- डोंबिवलीकराना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी झटत आहेत. त्यांचे प्रामाणिक प्रयत्न निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत. ही मंडळी दैनंदिन आढावा घेऊन रुग्णांना दिलासा देत आहेत. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी नवनवीन जागा उपलब्ध करत आहेत. केडीएमसीच्या या मनोभावे सेवेबद्दल अपप्रचार करणे हा कृतघ्नपणा ठरेल. मी मात्र या निरपेक्ष सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्स केडीएमसी !

 475 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.