उजाड डोंगर हिरवा करण्याचा “अनुभव”चा संकल्प

दोन हजार रोपे आणि दहा हजार बियांचे केले रोपण : बारा वर्षे वृक्ष संवर्धन करण्याचा अनुभव मांजरेकर यांचा निर्धार

बदलापूर : एखाद्याने मनात घेतले तर काय करू शकतात, याचे अनेक किस्से आपण ऐकत आलो आहोत. एकटा माणूस जंगल निर्माण करतो, तर कुठे तलाव खोदत असतो. बदलापूरमधील एक प्रयोगशील शेतकऱ्याने यंदा असाच एक संकल्प केला आहे. बदलापूर पासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगाच्या डोंगरावर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ते सुद्धा तब्ब्ल एक तप सातत्याने करण्याचा संकल्प केला आहे. कोरोनाच्या या संचार बंदीमध्ये त्यांनी या कार्याला प्रारंभ केला आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे अनुभव शरद मांजरेकर. दोन हजार रोपे आणि दहा हजार बियांचे रोपण त्यांनी केले आहे.
अंबरनाथ तालुक्यात अनेक शेतकरी प्रयोगशील आहेत. आपापल्यापरीने हे शेतकरी स्वतः बदलत्या वातावरणाचा अभ्यास करून शेतीच्या उत्पादनात कशी वाढ करता येईल यासाठी धडपडत असतात. शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न कसे घेता येईल. त्यांना जोड व्यवसाय कोणता करता येईल यासाठी हे कृषी संशोधक सातत्याने यशस्वी प्रयोग करीत असतात. अनुभव मांजरेकर हे त्यातील एक शेतकरी. राज्यासह देश आणि परदेशात जाऊन तेथील यशस्वी शेतीचा अनुभव मांजरेकर यांनी अभ्यास केला आहे. बदलापूरजवळील बेंडशीळ गावात अनुभव मांजरेकर यांची शेती आहे. आपल्या या शेतात ते विविध प्रयोग यशस्वी करीत असतात. गेल्या रब्बी हंगामात आपल्या शेतात यशस्वीपणे स्ट्रॉबेरीची लागवड अनुभव मांजरेकर यांनी केली होती. आपल्या शेतात असंख्य प्रकारची फुल, फळे आणि औषधी झाडे त्यांनी लावली आहेत. त्यासाठी त्यांनी वर्षाजल संचयन हा प्रकल्पही यशस्वीपणे राबविला आहे. यंदा त्यांच्या शेतापासून दोन किलोमिटर अंतरावरील जंगलात स्थानिक आदिवासींच्या मदतीने दोन हजार देशी फळ झाडांच्या रोपांची लागवड केली आहे. तसेच तब्बल दहा हजार फळबिया रूजविल्या. पुढील किमान १२ वर्षे दर पावसाळ्यात हा उपक्रम सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. या जंगलपट्ट्यात पशू, पक्षांसाठी जागोजागी नैसर्गिक पाणवठे असून मुबलक पाणी आहे, मात्र फारसे अन्न नाही. फळझाडांमुळे येथील जीवांना मुबलक अन्न मिळावे, आणि जैवविविधतेची साखळी पुन्हा निर्माण व्हावी हा हेतू असल्याचे अनुभव मांजरेकर यांनी सांगितले.
सह्याद्रीच्या डोंगररांगावरील चंदेरी आणि ताऊली डोंगर रांगांच्या परिसरात बऱ्या पैकी वनसंपदा टिकून असली तरी बराचसा डोगर नैसर्गिक अथवा मानवी आक्रमणांमुळे बोडका उजाड झाला आहे. या परिसरात देशी फळझाडे रूजविण्यासाठी अनुभव मांजरेकर यांनी तयारी केली. त्यासाठी फळ बिया जमवल्या, काही रोपे तयार केली. चिकण्याची वाडीतील आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीने गेल्या आठवड्यात त्यांनी जंगलात रोप लागव़ड केली आणि बिया रूजविल्या. आंबा, काजू, जांभूळ, चिंच, आवळा अशा फळझाडांबरोबरच बहावा, ताम्हन आदी देशी झाडांच्या रोपांचा यात समावेश आहे. साधारण दोन हजार रोपे आणि दहा हजार बिया त्यांनी रूजविल्या. केवळ रोपे लावून ते थांबणार नाहीत, तर स्थानिक आदिवासी बांधवांबरोबर नियमित या रोपांची देखभालही ते सातत्याने करणार आहेत. दरवर्षी याच प्रमाणात लागवड करण्याचे त्यांनी ठरविले आहे. दरवर्षी शासन राज्यभरातील उजाड वन जमिनींवर पुन्हा हिरवाई रूजविण्यासाठी वृक्षारोपण मोहीम राबवित असते. मात्र यंदा ‘कोरोना’ संचार बंदी मुळे यात खंड पडला आहे. शासनाचा यंदा खंड पडला असला तरी काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी वैयक्तिकरित्या जंगलात रोप लागवड करून हा हिरवा वसा कायम राखण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
आपण सातत्याने निसर्गाकडून घेत रहातो. मात्र निसर्गाला त्या प्रमाणात देत नाही. निसर्ग हा एकमेव असा आहे कि आपण त्याला जितके देतो त्याच्या अनेक पटीने निसर्ग पुन्हा आपल्याला परत देत असतो हा माझा “अनुभव” असल्याचे मांजरेकर यांनी सांगितले. बँकेतून आपण पैसे काढतो. परंतु ज्यावेळी आपल्या खात्यातील पैसे शिल्लक नसतात त्यावेळी बँक आपल्याला पैसे देत नाही तसेच आपणही निसर्गाकडून कायम घेत असताना निसर्गाला काही तरी नेहमी देत रहावे असेही त्यांनी सांगितले. या डोंगर परिसरात सातत्याने फळझाडांची लागवड केली, तर भविष्यात स्थानिक आदिवासी, जंगलातील पशू आणि पक्ष्यांसाठी चांगले सकस अन्न मिळू शकेल. त्याचप्रमाणे जमिनीची धूप रोखली जाऊन पर्यावरणाचेही रक्षण होईल. पुढील किमान एक तप हा उपक्रम असाच सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण केलेल्या लागवडीपैकी निम्मी रोपे जरी जगली तरी आपला हेतू साध्य होईल असेही अनुभव मांजरेकर यांनी सांगितले.

 344 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.