संघर्षातून एमपीएससीची भरारी
अंबरनाथ : मनाशी निश्चय केला की मग कोणतेही काम कठीण नसतं, त्यामध्ये येणारे कोणतेही अडथळे मग सहज सुटू लागतात हे अंबरनाथ नगरपालिकेतील कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी वर्षा बांगर यांनी दाखवून दिलं आहे. त्या २०१९ च्या एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या असून त्यांची निवड सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा ( वर्ग १) या पदी झाली आहे. त्यांच्या या निवडीने त्यांच्या कुटुंबियात आणि पालिका वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.
मुळ जालना जिल्ह्यातील असलेल्या वर्षा यांचे वडील शासकीय सेवेत अधिकारी असल्याने त्यांची विविध ठिकाणी बदली व्हायची त्यामुळे आपलं कुटुंब ठाणे येथे स्थायिक करून ते मात्र बदली प्रक्रियेला सामोरे गेले. लहानपणापासूनच वर्षा अभ्यासात हुशार असल्याने तिने शालेय शिक्षण पुर्ण केल्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि पुढे फायनान्स विषयातून एमबीए केलं. वडील शासकीय सेवेत असल्याने आपल्या मुलीने स्पर्धा परीक्षा देऊन मोठं अधिकारी बनावं असं वाटत होतं. वडिलांची इच्छा व आपली देखील आवड म्ह्णून वर्षी ने स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली. याच परीक्षेतून तिला प्रथम दीड वर्षापुर्वी अंबरनाथ नगरपरिषदेत कर निर्धारक प्रशकीय अधिकारी म्ह्णून नोकरी लागली.
२०१३ साली वर्षाने स्पर्धा परीक्षा दिली मात्र मेन्समध्ये त्या उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत. दरम्यान लग्न झाल्याने कुटुंबाची व स्वतःची जबाबदारी वाढली. २०१३ ते २०१७ पर्यंत वर्षा ने एमपीएससी दिली मात्र त्या अनुत्तीर्ण झाल्या. कोणताही खाजगी क्लास अथवा इतर मार्गदर्शन नसल्याने उपलब्ध नोट्स आणि पुस्तकातूनच अभ्यास करावा लागत होता. त्याच वेळी आपल्या अपयशाची कारणं शोधून आता शेवटची एमपीएससी द्यायची अथवा हा नाद सोडून द्यायचा असा निश्चय केला व वर्षाने जोमाने पुन्हा अभ्यास करण्यास सुरुवात केली.
खरं तर कुटुंब, लहान मुलं सांभाळून अभ्यास करणे तसं कठीण होतं मात्र जिद्द उराशी असल्याने वर्षाने संपूर्ण तयारी केली मात्र या वेळेस त्यांना समांतर आरक्षणाचा फटका बसला. त्यामुळे त्यांची निवड फूड इन्स्पेक्टर साठी झाली. मात्र ही नोकरी त्यांनी स्वीकारली नाही. त्या अंबरनाथ नगरपरिषदेमधेच रुजू राहिले. दरम्यान समांतर आरक्षणाचा सुधारित आदेश जारी झाल्याने त्याचा फायदा मिळून वर्षा यांची निवड सहाय्यक संचालक पदी करण्यात आली. या संघर्षमय निवडीने वर्षा यांचा आनंद गगनात न मावणारा होता. यांच्या वडिलांचं ही स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांच्या कुटुंबामध्ये प्रचंड आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
543 total views, 2 views today