कोरोनाची सुरूवातीची लक्षणे वेगळी होती, आता ती बदलली आहेत. पोटदुखी, डोकेदुखी आणि उलटीचा त्रास असणाऱ्या रुग्णांना तपासणी अंती करोना झाल्याचे आढळून आले आहे.
अंबरनाथ : कोरोनाची लस बाजारात यायला अजून बराच काळ जाणार आहे आणि तितके दिवस संचार बंदी लागू करून घरात राहणे कुणालाच परवडणार नाही. सुरूवातीला आपल्याला या आजाराविषयी कोणतीही माहिती नव्हती. मात्र आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. कोविड उपचार केंद्र सुरू झाली आहेत. त्यामुळे पुरेशी खबरदारी घेऊन आत्मविश्वासाने बाहेर पडून दैनंदिन कामे करावी असा सल्ला अंबरनाथमधील सुप्रसिद्ध डॉ.राकेश पटेल यांनी दिला.
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इस्टच्या वतीने आयोजित साप्ताहिक ऑनलाईन सभेत बोलताना डॉ. राकेश पटेल यांनी वरील सल्ला दिला. कोरोना’विषयी बऱ्याच महत्त्वपूर्ण बाबी डॉक्टरांनी यावेळी सांगितल्या, तसेच सदस्यांचे शकांचे निरसन केले. सर्वांनी बाहेर पडताना सर्जिकल मास्क वापरणे अनिर्वाय आहे. दहा मिनिटांपेक्षा अधिक काळ बाहेर कुणाशीही गप्पा मारू नका. एन-९५ मास्क केवळ वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता सेवक आणि पोलिसांनी वापरावेत. इतरांनी साधे सर्जिकल मास्क वापरावेत. पीपीई कीट घालणे सोपे पण काढणे अवघड आहे. तपासणी उशिरा होत असल्याने बऱ्याच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत. संसर्ग झाल्यानंतर सातव्या दिवशी कोरोनाचा त्रास जाणवू लागतो. बरे झालेल्या रुग्णांनीही तीन आठवडे काळजी घ्यावी. कारण ३० टक्के रुग्णांना करोनातून मुक्त झाल्यानंतरही काही काळ त्रास होत असल्याचे दिसून आले असल्याचे डॉ. राकेश पटेल यांनी सांगितले. उपचारांसाठी रुग्ण उशिरा येत असल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. वेळेत चाचण्या होऊन त्याचे अहवाल आले, तर उपचार करणे सोपे जाईल. याकाळात कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष भेटी टाळा. अगदी सोसायटीमधील लोकांनीही एकत्र भेटू नये. पार्टी करू नये. त्यासाठी ही वेळ अजिबात चांगली नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
कोरोनाची सुरूवातीची लक्षणे वेगळी होती, आता ती बदलली आहेत. पोटदुखी, डोकेदुखी आणि उलटीचा त्रास असणाऱ्या रुग्णांना तपासणी अंती करोना झाल्याचे आढळून येत असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले. कोरोनाची लागण झालेल्या ८० टक्के रुग्णांवर घरच्या घरी उपचार करणे शक्य आहे. त्या त्या परिसरातील डॉक्टर्स रुग्णांच्या तब्येतीवर देखरेख ठेवतील. अशा परिस्थितीत कोविड सेंटरवरील ताण कमी होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आपल्याकडे मोठ्या प्रमाणात नागरिक कोरोना मुक्त होत आहेत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. करोनाच्या आजारावर मात केलेल्या नागरिकांनी कोविड सेंटरमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करून त्यामुळे यंत्रणेवरील ताण हलका होईल असा विश्वास डॉ. राकेश पटेल यांनी व्यक्त केला. कोरोना काळात इतर शारीरिक आजार असणाऱ्या रुग्णांची कुंचबणा होत आहे. ते उपचारासाठी बाहेर पडायला घाबरत आहेत. नाईलाजाने बाहेर पडलेच तरी त्यांना रुग्णालयात दाखल होण्यात अडचणी येत आहेत. घराघरात मानसिक तणाव वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांची अधिक कुचंबणा होऊ लागली आहे. त्यांच्याशी कुणीतरी सतत संवाद साधणे गरजेचे आहे. यासाठी स्वयंसेवक म्हणून पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अजून किमान वर्षभर करोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार नाही. भारतात तर अद्याप चाचण्या सुरू झालेल्या नाहीत. इंग्लंडमध्ये एप्रिल महिन्यात चाचण्यांना सुरूवात झाली. त्याचा पहिल्या फेरीचा अहवाल ऑक्टोबरमध्ये येईल. एकुणातच लशीसाठी किमान वर्षभर वाट पहावी लागणार असल्याचे डॉ. राकेश पटेल यांनी यावेळी बोलताना सांगितले. कोरोनासारख्या आजारात माणसाची प्रतिकार शक्ती महत्त्वाची आहे. मात्र ती प्रतिकार शक्ती काही दिवसात बाह्य औषधे घेऊन मिळविता येत नाही ती एक दिर्घकालीन प्रक्रिया आहे. मांसाहारामुळे शारीरिकदृष्ट्या माणसे सुदृढ वाटत असली तरी त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळे साधा, सत्त्वयुक्त आणि चौफेर आहार महत्त्वाचा असल्याचे डॉ. राकेश पटेल यांनी सांगितले.
1,103 total views, 2 views today