संचार बंदीला दिलेली मुदतवाढ रद्द करण्याची केली मागणी
बदलापूर : कोरोना संचार बंदीतही रूग्णसंख्या झपाट्याने वाढतच आहे. सातत्याने दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांवर उपासमारीची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे पुन्हा टाळेबंदी वाढवून व्यापाऱ्यांना देशोधडीला लावू नका अशी मागणी करत व्यापाऱ्यांमधून आता संचार बंदीला दिलेली मुदतवाढ रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. बदलापुरातील व्यापारी संघटनेने टाळेबंदी मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. बदलापुर मधील व्यापारी मंगळवारपासून आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. सुरूवातीला शहरात निषेधाचे फलक लावले जाणार आहेत.
कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामीण भागात टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. दुकाने सुरू होऊन महिना होत नाही तोच पुन्हा संचार बंदी जाहीर केल्याने व्यापाऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. अशाच प्रकारे दुकाने बंद राहिल्यास आम्ही देशोधडीला लागू अशी भीती व्यापाऱ्यांना आहे. आज सुरक्षित अंतर पाळत बदलापुरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत टाळेबंदीच्या संकटावर चर्चा केली. यापूर्वी ज्यावेळी दुकाने सुरू केली त्यावेळी व्यापाऱ्यांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले होते. मात्र भाजी विक्रेते, चिकन, मासे विक्रेते, आदी दुकानांमध्येच सर्वाधिक गर्दी होत असून येथे कोणतेही नियम पाळले जात नाही. तरीही ती दुकाने सुरू आणि आम्ही नियम पाळूनही आमची दुकाने बंद आहेत.
नव्याने केलेल्या संचार बंदीतही रूग्णसंख्या कमी होण्याऐवजी रूग्ण वाढलेच आहेत. त्यामुळे आमची दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी बदलापुरच्या बाजारपेठ व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. चार महिने दुकाने बंद असूनही आम्ही दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांना वेतन दिले मात्र आता आमच्या वर उपासमारीची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी दिली आहे. या बंदीबाबत तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलनचा इशाराही त्यांनी दिला आहे बदलापुर मधील व्यापारी मंगळवारपासून आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. सुरूवातीला शहरात निषेधाचे फलक लावले जाणार आहेत. १६ जुलैपासून दुकानाबाहेर व्यापारी काळे झेंडे घेऊन निषेध करणार आहेत. तर १९ तारखेनंतर निर्णय न झाल्यास उग्र आंदोलन केले जाईल असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
446 total views, 3 views today