महाराष्ट्रात भाजप राष्ट्रवादी आरपीआय महायुतीसाठी शरद पवारांनी एनडीएमध्ये यावे

शिवसेना सोडून भाजपला पाठिंबा द्यावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा शरद पवारांना प्रस्ताव

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘एनडीए’त सामील होण्याचं निमंत्रण दिलं आहे. ना. रामदास आठवलेंनी शरद पवारांना शिवसेना सोडून भाजपला पाठिंबा देण्याची विनंती केली. महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची महायुती व्हावी, अशीदेखील इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी आपल्या अधिकृत फेसबूक पेजवर व्हिडीओ आणि प्रसिद्धीपत्रक जारी करीत मत मांडले आहे.
“शरद पवार यांनी एनडीएसोबत यावं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करावं. शरद पवार यांच्या अनुभवाचा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी फायदा होईल. शिवसेनेला पाठिंबा देऊन राष्ट्रवादीचा काहीच फायदा नाही. त्यामुळे शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे”, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.
“महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची महायुती व्हावी. ही महायुती प्रचंड शक्तीशाली राहील. त्यामुळे शरद पवार यांना विनंती आहे की, त्यांनी शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढावा. हे माझं वैयक्तिक मत आहे. शरद पवार यांनी याबाबत विचार करावा”, असं आठवले म्हणाले.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्रातील अत्यंत कर्तव्यदक्ष नेते आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर विविध प्रश्नांची जाणीव असलेले ते नेते आहेत. देशाचा विकास करण्यासाठी आपण उद्योगक्षेत्रात पडलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली आहे”, असंदेखील रामदास आठवले म्हणाले.

 505 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.