वागळे प्रभागसमितितर्गत पहाणी करताना आयुक्तांनी केली कारवाई
ठाणे : महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी आज वागळे प्रभाग समितीतींतर्गत शांतीनगर, सीपी तलाव तसेच किसननगर फिव्हर ओपीडीला भेट देवून माहिती घेतली. दरम्यान सीपी तलाव परिसरात अस्वच्छतेच्या कारणावरून महापालिका आयुक्तांनी तेथील स्वच्छता निरीक्षकास जागेवरच निलंबित केले.
आज सकाळी महापालिका आयुक्त डाॅ. शर्मा यांनी वागळे प्रभाग समितीतींतर्गत शांतीनगर परिसरातील सर्व गल्यांची पाहणी केली. तेथील नागरिकांशी साफसफाईबाबत संवाद साधला. त्यानंतर त्यांनी किसननगर फिव्हर ओपीडीला भेट दिली आणि तेथील कामकाजाची माहिती घेतली.
याशिवाय त्यांनी सीपी तलाव परिसरास भेट देवून स्थानिक नगरसेविका आणि वागळे प्रभाग समिती अध्यक्षा शिल्पा वाघ, माजी नगरसेवक डाॅ. जितेंद्र वाघ यांच्याशी संवाद साधून तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी स्थानिक कार्यकर्ते बाबासाहेब कांबळे हेही उपस्थित होते.
दरम्यान सीपी तलाव परिसरातील अस्वच्छतेच्या कारणावरून तेथील स्वच्छता निरीक्षकास जागेवरच निलंबित करून स्वत:च त्याच्या निलंबनाचा आदेश लिहून आस्थापना विभागाकडे दिला. तसेच आज सायंकाळपर्यंत त्या परिसराची साफसफाई करण्याचे आदेश दिले.
या पाहणी दौऱ्यामध्ये उप आयुक्त संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, सहाय्यक आयुक्त विजयकुमार जाधव, कार्यकारी अभियंता धुमाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
620 total views, 1 views today