हरविलेल्या रुग्णाचा ४८ तासांत शोध घेण्याचे महापालिकेचे आश्वासन

रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची किरीट सोमय्या व निरंजन डावखरेंची मागणी

ठाणे : महापालिकेच्या विशेष कोविड रुग्णालयातून हरविलेल्या ७२ वर्षीय रुग्णाचा ४८तासात शोध घेण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेने भाजपच्या शिष्टमंडळाला आज दिले. दरम्यान, रुग्ण हरविण्याच्या गलथान प्रकाराबद्दल विशेष कोविड रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे प्रभारी व माजी खासदार किरीट सोमय्या व आमदार निरंजन डावखरे यांनी कापूरबावडी पोलिसांकडे केली आहे.
ठाण्यातील भालचंद्र गायकवाड या ७२ वर्षीय पॅरालिसिस व कोविड संसर्ग झालेल्या वृद्धाला विशेष कोविड रुग्णालयात ४ जुलै रोजी दाखल केले होते. मात्र, त्यांचा दोन दिवसांपासून शोध लागत नसल्याबद्दल गायकवाड कुटुंबीयांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल दाद मागितली होती. त्यानंतर भाजपाचे ठाणे प्रभारी किरीट सोमय्या व आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आज कापूरबावडी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर सनदी अधिकारी रणजीतकुमार व कोविड रुग्णालयाचे डीन डॉ. योगेश शर्मा यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी हरविलेले रुग्ण भालचंद्र गायकवाड यांचे भाऊ आनंद, जावई रविंद्र साळवी, पुतण्या समीर, सून रेणुका आणि अर्चना आदी उपस्थित होते.
गेल्या तीन दिवसांपासून गायकवाड कुटुंबियांना महापालिका व पोलिस यंत्रणांकडून दाद दिली जात नव्हती. मात्र, आज भाजपा नेत्यांसोबत महापालिका व पोलिस अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी पोलिस, महापालिका आणि विशेष कोविड रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने गलथानपणा झाला असल्याचे मान्य केले, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. महापालिकेच्या ताब्यातील रुग्ण हॉस्पिटलमधून हरविल्यावर ‘मिसिंग’ची तक्रार दाखल कशी केली जाऊ शकते, असा सवाल किरीट सोमय्या यांनी पोलिसांना केला.
हरविलेल्या रुग्णाचा ४८ तासांत शोध घेण्याचे आश्वासन रणजीतकुमार व डीन डॉ. योगेश शर्मा यांनी भाजपाच्या नेत्यांना दिले. त्यासाठी हॉस्पिटलबाहेरच्या यंत्रणांचीही मदत घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

 574 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.