महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम परत द्या

मनविसे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी पालकमंञी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली मागणी

कोरोना काळातील विविध विषयांवर केली सकारात्मक चर्चा

ठाणे : हजारो सर्वसामान्य रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाला नसून त्यांनी खाजगी रुग्णालयाची बिलं स्वत:च्या खिशातून भरलेली आहेत. या रुग्णांच्या बिलाची रक्कम योजनेच्या नियमानुसार धनादेशाद्वारे त्यांना परत मिळवून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी जिल्ह्याचे पालकमंञी एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली.
यावेळी कोरोनासंर्दभातील विविध विषयांवर चर्चा झाली असून शिंदे यांनी याप्रश्नी सकारात्मकता दर्शवल्याने गोरगरीब रुग्णांना या योजनेचा लाभ मिळून त्यांच्या डोक्यावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.
महात्मा फुले योजनेतील लालफिती कारभारात गोरगरीब रुग्णांच्या खिशाला अव्वाच्या सव्वा बिलामार्फत काञी बसत आहे. त्यामुळे कॅशलेस मेडिक्लेम योजनेत कंपनीला बिल सादर केल्यानंतर सर्व रुग्णांना रुग्णालयात भरलेल्या पैशांचा परतावा मिळतो. अगदी त्याच धर्तीवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम परत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली होती. यावेळी मनविसेचे शहराध्यक्ष किरण पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले असून योजनेतील ञुटी दूर करुन गोरगरीब रुग्णांना प्रशासनाने आधार देण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याचे पालकमंञी एकनाथ शिंदे यांचीही या प्रश्नी पाचंगे यांनी भेट घेतली. यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंर्तगत पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम ‘कॅशलेस मेडिक्लेम’च्या धर्तीवर परत देता येऊ शकते, असे पाचंगे यांनी पालकमंञी शिंदे यांना निर्दशनास आणून दिले. त्यानुसार शिंदे यांनीही तात्काळ याप्रश्नी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुधाकर शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली. नेमकी कशा पध्दतीने या मागणीची कार्यवाही करता येईल. त्याचा आढावा घेण्यास सांगितले. दरम्यान, कोरोना काळातील विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत पाचंगे यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केली असून या योजनेचा तळागाळातील रुग्णांना फायदा व्हावा यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पालकमंञी शिंदे यांनी पाचंगे यांना दिले.

 632 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.