टीजेएसबी सहकारी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक अजित रानडे यांचे निधन

कोरोनाशी झुंज ठरली अपयशी, मृत्यूची उत्साही, जगनमित्र असलेल्या कार्यकर्त्यावर झडप

ठाणे: टीजेएसबी सहकारी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक अजित रानडे यांचे आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास वयाच्या पंचावन्नव्या  वर्षी कोविड १९ कोरोनाच्या संसर्गाने होरायझन रुग्णालयात निधन झाले. कोरोनाची बाधा झाल्यावर रुग्णालयात दाखल केलेले अजित रानडे अतिदक्षता विभागात होते. सुमारे तीन आठवड्याहून अधिक दिवस ते कोरोनाशी झुंजत होते. अजित रानडे यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
अजित रानडे गेली बत्तीस वर्ष टीजेएसबी सहकारी बँकेच्या सेवेत होते. कारकून ते सहाय्यक सरव्यवस्थापक पदापर्यंत त्यांनी वाटचाल केली होती.बँकेच्या जनसंपर्काचे काम सफाईदारपणे करण्याचे त्यांच्या कौशल्याने जगनमित्र म्हणून ते ओळखले जात.
घंटाळी सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे कार्यकर्ते, अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. गजानन महाराजांचे निस्सीम भक्त असलेले अजित रानडे ठाण्यातील श्रीगजानन सेवा मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते. चरई येथील लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळाचेही ते अध्यक्ष होते. ठाण्यातील नववर्ष स्वागत यात्रेत त्यांचा सक्रिय सहभाग होता.  उत्साही, धडाडीचे, हसतमुख, मनमिळाऊ असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.
येथील नौपाड्यातील रामवाडी भागाचे रहिवासी असलेले अजित रानडे कालांतराने चरई येथे रहाण्यास गेले होते. अजित रानडे यांच्या निधनाने  टीजेएसबी बँक, घंटाळी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळ, श्रीगजानन महाराज सेवा मंडळ यासह त्यांचा मोठा मित्र परिवार शोकसागरात बुडाला आहे. अजित रानडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नुकताच विवाह झालेली मुलगी, जावई  आणि मोठा परिवार आहे.

 487 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.