परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
मुंबई: कोरोना युध्दात पोलिस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांबरोबरच राज्यातील एस.टी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुढे येवून काम केले. मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांना वेतन वेळेवर देणे शक्य होत नाही. मात्र जुलै महिन्यात या सर्व कर्मचाऱ्यांचे थकित वेतन देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या भागातून नोकरीच्या ठिकाणी सोडणे, परप्रांतिय कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर किंवा जिल्ह्यापर्यत पोहोचविण्याचे काम एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र त्यांना मे महिन्याचा पगार वेळेवर मिळाला नसतानाच तो अर्धाच मिळाला. त्यातच जून महिन्याचा पगार अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर त्यांना वेतन देण्यात उशीर झाल्याचे परिवहन मंत्री परब मान्य करत या महिन्यात त्यांचे थकित वेतन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सध्या एसटी महामंडळाला फक्त जिल्ह्यातंर्गतच आपल्या बसेस चालवाव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर मर्यादा येत असल्याने कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नाही. त्यातच मधल्या काळात शासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेसाठी आणि परप्रांतीय कामगारांसाठी एसटी बसेस चालविण्यात आल्या. त्याची काही रक्कम अद्यापही एसटी महामंडळाला मिळाली नसल्याचे एसटी महामंडळातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
दरम्यान, आर्थिक अडचणीमुळे एसटीने वाहकांचे भत्ते काही प्रमाणात बंद केले आहेत. त्यामुळे मुंबई, उल्हासनगर, कल्याण, बदलापूर दरम्यान चालविण्यात येणाऱ्या लांब पल्ल्याच्या चालक-वाहकांना चहा-नाष्ट्यासाठी स्वत:च्या खिशातून पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे भत्ते बंद केलात तर किमान वेतन तरी वेळेवर द्या अशी मागणीही या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
640 total views, 2 views today