उल्हासनदी दुथडी भरून वाहू लागली

गेल्या दोन दिवसांत दिवसा, रात्री-अपरात्री वीजपुरवठा तासनतास खंडित झाला असून या विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण झाले.

बदलापूर : काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने बदलापुरात गेल्या दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी दिवसभर अधूनमधून पाऊस सुरु होता. रविवारी पहाटे पासून जोरदार पाऊस सुरु होता. त्यामुळे उल्हासनदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
शनिवारी पावसाने अधून मधून विश्रांती घेत दमदार हजेरी लावली होती. शनिवारी रात्रीपासून पुन्हा पावसाने जोर पकडला. दुपारपर्यंत पावसाचा हा जोर कायम होता. वारेही वाहत होते. दुपारनंतर पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी भुरभुर मात्र सुरूच आहे. गेल्या २४ तासात अंबरनाथ तालुक्यात सरासरी १३८.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शहराच्या काही सखल भागात पाणी साचले. उल्हासनदीप्रमाणे शहराच्या भागाभागातून उल्हासनदीला जाऊन मिळणारे नालेही दुथडी भरून वाहू लागले आहेत. उड्डाण पूला खालून वाहणाऱ्या नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने काही हौशी तरुण इथे मासे पकडताना दिसत होते. जूनमध्ये सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर पाऊस काहीसा लांबला होता. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. पावसाने दमदार हजेरी लावल्याने वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
पावसाच्या पहिल्याच दणक्यात महावितरण हतबल झाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांत पाहायला मिळत आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी एप्रिल व मे महिन्यात भारनियमन करण्यात आले होते. त्यामुळे यंदा पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहील, अशी अपेक्षा होती. परंतु गेल्या दोन दिवसांत दिवसा, रात्री-अपरात्री वीजपुरवठा तासनतास खंडित झाला असून या विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण झाले आहेत.
भातशेती लावणीच्या व इतर कामांसाठी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती. गेल्या दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून शेतकरी भात लावणीच्या व शेतीच्या इतर कामाला लागले आहेत.
आधीच लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यातच शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर पश्चिमेकडील रमेशवाडी परिसरात काही दुकानात पाणी शिरले. दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झाल्याचे या भागातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

 532 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.