आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आश्वासन : अधिकाऱ्यांचा थकीत रकमेसह पगारही मिळणार
अंबरनाथ : अंबरनाथमधील उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या कै. डॉ. बी. जी छाया रुग्णालयाच्या डॉक्टरांचा प्रलंबित असलेला वेतनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. अंतिम टप्प्यात असलेली समावेशन प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन डॉक्टरांना नियमितपणे वेतन मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. बी. जी. छाया रुग्णालयाची मोडकळीस आलेली इमारत पाडून त्या जागी नवीन सुसज्ज इमारत उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट आश्वासनही राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
कोरोना परिस्थिती व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे गुरुवारी बदलापुर मध्ये आले होते. बदलापूर पालिका सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी अंबरनाथ येथील डॉ. बी. जी. छाया रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या वेतनाचा प्रश्न प्रलंबित असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले. सदाशिव पाटील यांनी छाया रुग्णालयाची सत्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वरील आश्वासन दिले.
डॉ. बी. जी. छाया रुग्णालयाबाबतची सविस्तर माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अधिकाऱ्यांकडून समजून घेतली. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी या रुग्णालयाबाबत सविस्तर माहिती आरोग्य मंत्र्यांना दिली. छाया रुग्णालय पालिकेकडून शासनाकडे हस्तांतरित केल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांचे समावेशन करावे लागते. अंबरनाथच्या कै. डॉ. बी. जी छाया रुग्णालयातील डॉक्टरांची समावेशन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आरोग्य विभागाचे प्रधान सचिव त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करतील. त्यांना नियमितपणे वेतन सुरु होईल, मागील थकबाकी सह सर्व वेतन मिळेल, असे राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे छाया रुग्णालयाची इमारत जुनी झाली असून मोडकळीस आलेली इमारत पाडून नवी सुसज्ज इमारत उभारण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
576 total views, 1 views today