अंबरनाथ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा
बदलापूर : अंबरनाथ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकला आहे. सभापतीपदी शिवसेनेच्या अनिता निरगुडा तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अंबरनाथ तालुका प्रमुख आणि पंचायत समितीचे गटनेते बाळाराम कांबरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अंबरनाथ पंचायत समितीत आठ सदस्यांपैकी शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. तर राष्ट्रवादीचे दोन आणि भाजपचा एक सदस्य आहे. आरक्षण सोडत निघाल्यानंतर यातील सभापतीपद हे अनुसूचित जमाती महिला साठी राखीव होते. शिवसेनेच्या सदस्य असलेल्या निरगुडा यांना त्यामुळे ही संधी मिळाली. तर बाळाराम कांबरी हे उपसभापती झाले आहेत.
गेल्या अडीच वर्षात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या कार्यकाळात ग्रामीण भागात पंचायत समितीच्या माध्यमातून विकास कामे झाली आहेत. जिल्हा परिषद आणि राज्यात सत्ता शिवसेनेची असल्यामुळे या पुढील काळात देखील विकासकामांवर भर देणार असल्याचे या निवडीनंतर पंचायत समितीचे उपसभापती आणि शिवसेनेचे गटनेते बाळाराम कांबरी यांनी सांगितले. ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सिमेंट काँक्रिटचे रस्ते व नळपाणी योजना कार्यान्वित करून पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावणे हे प्रमुख ध्येय असल्याचे बाळाराम कांबरी यांनी सांगितले.
436 total views, 2 views today