बदलापूरमध्ये “रॅपिड अँटीबॉडीज टेस्ट”

बदलापूर नगरपालिका आणि शिवसेवा सामाजिक संस्थेचा संयुक्त कार्यक्रम

बदलापूर : बदलापूरमध्ये करोना बाधितांची संख्या मर्यादित असली तरी संशयीत आणि शंका असलेल्या व्यक्तींचे निरसन पहिल्या टप्प्यात व्हावे या उद्देशाने बदलापूर शहरात रॅपिड अँटीबॉडीज तपासणी मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. बदलापूर नगरपालिका आणि शिवसेवा सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यामाने ही मोहीम सुरु झाली आहे. पूर्वेकडील महात्मा गांधी चौकातील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक एकमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. कोरोना लढ्यात आघाडीवर काम करणारे, दारिद्र रेषेखालील व्यक्ती आणि पालिकेने शिफारस केलेल्यांची इथे मोफत चाचणी होणार आहे तर इतरांना चाचणीसाठी ९०० रूपये मोजावे लागणार असल्याची माहिती प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिली.
बदलापूर नगरपालिका क्षेत्रात करोना बाधितांची संख्या मुंबई महानगर क्षेत्रातील इतर शहरांच्या तुलनेत अजूनही कमी आहे. बुधवारपर्यंत करोनाबाधितांची संख्या ७५० पर्यंत पोहोचली होती. त्यातील ३५८ रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला ३६९ रूग्णांवर विविध रूग्णांलयांमध्ये उपचार सुरू असून यातील १७८ रूग्ण हे सौम्य लक्षणे असलेली आहेत. २४ जण हे घरीच अलगीकरणात आहेत. शहरातील करोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या आठवड्यापासून शहरात घरोघरी जाऊन तापमान आणि ऑक्सिजनची पातळी मोजण्याच्या सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात आली आहे. बुधवारपर्यंत १०१ पथकांच्या माध्यमातून ३८ हजार ३२७ कुटुंबातील एक लाख नऊ हजार २६४ जणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते. त्यातील संशयीत रूग्णांच्या चाचणीसाठी शहरात रॅपिड अँटीबॉडीज तपासणी मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. बदलापूर नगरपालिका आणि शिवसेवा सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यामाने बदलापूर पूर्वेतील शाळा क्रमांक एक येथे मंगळवारपासून या रॅपिड अँटीबॉडीज टेस्ट ला सुरूवात करण्यात आल्याची माहिती प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिली आहे.
ज्या व्यक्तींना करोना विषाणूची लागण झाल्याचा संशय असेल किंवा जी व्यक्ती बाधितांच्या संपर्कातील असेल, ते इथे चाचणी करू शकणार आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात मोडणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीसाठीही ही चाचणी फायदेशीर ठरणार आहे. नागरिकांना प्रतिचाचणी ९०० रूपये मोजावे लागतील. करोनाच्या लढ्यात आघाडीवर कार्यरत असलेले आरोग्य सेवक, पालिकेचे सफाई कामगार, वैद्यकीय अधिकारी, पालिकेचे कर्मचारी आणि दारिद्र रेषेखाली येणारे नागरिक तसेच पालिका शिफारस करेल अशा व्यक्तींची मोफत चाचणी केली जाणार आहे.
या चाचणीनंतर करोना तपासणीच्या स्वॅब चाचणीसाठी लागणारा वेळ आणि खर्च वाचणार असून रूग्ण पहिल्याच टप्प्यात ओळखणे सोपे होणार आहे. पहिल्या दिवशी २२ रूग्णांची तपासणी झाली असून त्यात तीन संशयित आढळले असल्याची माहिती प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिली आहे.

 426 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.