रुग्णालयाचा आरक्षित भूभाग पडून

सत्तर वर्षे दुर्लक्ष, अजूनही अतिक्रमणापासून सुरक्षित

अंबरनाथ : येथील सूर्योदय हौसिंग सोसायटीच्या हद्दीत गेल्या सात दशकांपासून रुग्णालयासाठी तब्बल साडेचार एकरचा भूखंड रुग्णालयासाठी राखीव आहे. मध्यंतरीच्या काळात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यानी स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत प्रयत्न करून याठिकाणी खाजगी रुग्णालय प्रकल्प साकारण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्याप त्याला यश आलेले नाही. किमान आता तरी या भूखंडाचा वापर रुग्णालय उभारण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. कानसई विभागातील या भूखंडावर रुग्णालय झाले तर उल्हासनगर ते कर्जत पर्यंतच्या हजारो नागरिकांची सोय होऊ शकणार आहे.
कोरोना संकट काळात सर्वात प्रकर्षाने लक्षात आलेली उणीव म्हणजे आरोग्य सुविधांची कमतरता. स्वातंत्रोत्तर काळात मुंबईच्या परिघात नवी मुंबईसह अनेक महानगरे उदयास आली. मात्र तेथील बहुतेक नागरिकांना आरोग्य सुविधेसाठी अजूनही मोठ्या प्रमाणात मुंबईतील मोजक्या रुग्णालयांवरच अवलंबून रहावे लागते. त्यातही कल्याण-कर्जत पट्ट्यात एकही अद्यायावत रुग्णालय अथवा वैद्यकीय महाविद्यालय नाही.
अंबरनाथच्या कानसई विभागात सूर्योदय सोसायटी अंतर्गत १८ हजार १९६.२० चौरस मिटरचा भूखंड रुग्णालयासाठी गेली सत्तरहून अधिक वर्षे राखीव आहे. आताच्या बाजारभावाप्रमाणे कोट्यवधी रूपये किंमत असणाऱ्या या भूखंडावर सुदैवाने अद्याप कोणतेही अतिक्रमण झालेले नाही. अंबरनाथमधील सूर्योदय सोसायटी ही देशातील सर्वात मोठ्या सोसायट्यांपैकी एक असून त्यात ६३० भूखंड आहेत. पूर्व विभागात रेल्वे स्थानक परिसर, साई विभाग, खेर विभाग आणि कानसई विभागात हे भूखंड आहेत. १९४७ मध्ये शासनाकडून तत्कालिन बाजारभावानुसार जमीन खरेदी करून या सोसायटीची स्थापना झाली. त्यात सार्वजनिक सोयी सुविधांसाठी काही भूखंड राखीव आहेत. सदस्यांंसाठी काही जागा राखीव असाव्यात आणि त्यांना सवलतीच्या दरात उपचार मिळावेत, या अटींवर हा भूखंड रुग्णालयासाठी देण्यास सोसायटी तयार आहे. त्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी काही विश्वस्त संस्थांशी संपर्कही साधला. स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही त्यासाठी प्रयत्न केले. मात्र अद्यााप त्याला मूर्त रूप येऊ शकलेले नाही.
मध्यंतरी शासनाने सूर्योदय सोसायटी सदस्यांनी अटी-शर्तीचा भंग झाल्याने भूखंडांचे हस्तांतरण बंद केले होते. तीन वर्षांपूर्वी पुन्हा हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर आम्ही काही मोठ्या रुग्णालय व्यवस्थापकांशी चर्चा केली. सोसायटी सदस्यांना सवलतीच्या दरात उपचार मिळावेत, इतकीच आमची अट आहे. ती अट मान्य असणाऱ्या संस्थेला सोसायटी ‘ना हरकत दाखला’ देईल अशी प्रतिक्रिया सूर्योदय सोसायटीच्या चेअरमन शोभा शेट्टी यांनी सांगितले.
या आरक्षित जागेवर अद्याप अतिक्रमण झालेले नाही. रेल्वे स्थानकापासून चालत अवघ्या आठ मिनिटात पोहोचू शकू इतक्या जवळ हि जागा आहे. कल्याण ते कर्जत दरम्यान इतकी चांगली जागा उपलब्ध नसल्याने येथे चांगल्या दर्जाचे रुग्णालय खाजगीकरणातून उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी मुंबई ठाणे परिसरातील नामांकित रुग्णालय आस्थापनांशी आमची चर्चा सुरु आहे. काही आस्थापनांनी या जागेची प्रत्यक्ष पहाणी केली असल्याचे सूर्योदय सोसायटीचे सेक्रेटरी नरेंद्र काली यांनी सांगितले. विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांनीही यासाठी प्रयत्न केल्याची आठवण नरेंद्र काळे यांनी सांगितली.
पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ठाणे आणि मुंबई येथील मोठ्या रुग्णालयांच्या आम्ही संपर्कात आहोत. काही रुग्णालयांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पहाणी सुद्धा केली आहे. शासनातर्फे या जागेवर रुग्णालय उभारून चालवणे वाटते तितके सोपे नसल्याने खाजगी व्यवस्थापनाच्या शंसहकाऱ्याने येथे सर्व सुसज्ज असे मोठे रुग्णालय उभे रहावे आणि अंबरनाथ व आसपासच्या नागरिकांना कमी दरात चांगली सुविधा मिळावी यासाठी आपला पाठपुरावा सुरु असल्याचे स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सांगितले.

 428 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.