राजेश टोपे यांचा १ लाख २० हजार रुग्णांना मोफत उपचाराचा दावा खोटा
जनतेची माफी मागून राजीनामा देण्याची मनसेची मागणी
नवी मुंबई : महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी १ लाख २० हजार कोरोनाबाधित रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार केलेत या विधानाला मनसेने आक्षेप घेतला आहे. मुळातच महात्मा फुले जन आरोग्य योजना ही कोरोना पेशंट व्हेंटिलेटरवर असेल तरच लागू पडते आणि अशा रुग्णांची संख्या एक ते दोन टक्क्यांच्या वर असत नाही. हॉस्पिटल मध्ये देखील चौकशी केल्यास हेच उत्तर दिले जाते की आपला रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच तुम्हाला ही योजना लागू आहे, असे शेकडो अनुभव राज्यातील जनतेला आले आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर (१५५३८८/ १८००२३३२२००) संपर्क केल्यास हीच माहिती मिळते. मग महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार कोरोनाबाधित रुग्ण संख्या असताना १ लाख २० हजार रुग्णांना या योजनेतून कसा लाभ मिळू शकेल असा प्रश्न मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. राजेश टोपे खोटे बोलत आहेत आणि उल्लू बनवत आहेत, त्यासाठी त्यांनी एक तर या १ लाख २० हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचे पुरावे सादर करावेत अथवा महाराष्ट्राची माफी मागून मंत्रीपदावर खोटे बोललो म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे.
522 total views, 2 views today