मागेल त्याला वृक्ष देणार

बदलापूर हिरवे करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना

बदलापूर : वन विभागाच्या सहकार्याने बदलापूरमधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोप लागवड करण्याची एक योजना आमदार किसन कथोरे यांनी हाती घेतली आहे. या योजनेत मागेल त्याला देशी झाडांचे रोप दिले जाईल. या योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त बदलापूरकरांनी आपल्या इमारतीच्या आवारात झाडे लावून पर्यावरणाची जोपासना करावी, असे आवाहन त्यांनी कृषिदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केली.
कृषिदिनाचे औचित्य साधून वन विभागाने बदलापूर शहराच्या वेशीवरील साठ हेक्टर राखीव वनपट्ट्यात काही देशी वृक्षांची लागवड केली. गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक वनीकरण विभागामार्फत शहराबाहेरच्या डोंगरावर हिरवाई जोपासण्यात आली आहे. या परिसरात तीन निरीक्षण केंद्र (वॉच टॉवर), दोन तळी, नैसर्गिक ओढे, नाले आहेत. वड, पिंपळ, साग मोह, उंबर आदी देशी झाडे याठिकाणी आहेत. त्याचप्रमाण नक्षत्र उद्याानही आहे. बदलापूरकरांसाठी एक उत्तम पर्यटन स्थऴ म्हणून हा परिसर विकसीत केला जात आहे. आमदार किसन कथोरे, वन क्षेत्रपाल एस.सी. चव्हाण, तुकाराम हिरवे, पालिका मुख्याधिकारी दीपक पुजारी आदी याप्रसंगी उपस्थित होते.
भविष्यात हिरवे बदलापूर अशी ओळख टिकवून ठेवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाने झाडांची जोपासना करणे गरजेचे आहे. शहराच्या वेशीवर ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात वृक्ष संपदा आहे, तशी शहराच्या अंतर्गत भागातही झाडे असायला हवीत. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या नावे किमान एक तर झाड लावावे, असे आवाहन आमदार कथोरे यांनी यानिमित्ताने केले.

 543 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.