अंध बांधवांची सामाजिक बांधिलकीची “दृष्टी”

हजारो मेणबत्या रायगड जिल्ह्यात रवाना
बदलापूर : स्वतःचे आयुष्य अंधारात व्यतीत करणाऱ्या वांगणी येथील अंध बांधवानी रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या तडाख्यात सापडलेल्या गावात “प्रकाश” देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ना नफा ना तोटा या धर्तीवर हजारो मेणबत्या वांगणी येथून रायगड जिल्ह्यात वितरित करण्यात आल्या आहेत. दृष्टी फाउंडेशनच्या केलेल्या कार्याची, त्यांच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या “दृष्टी”चीच चर्चा सध्या या परिसरात सुरु असून त्यांचे कौतुकही होत आहे.
वांगणी या गावात अंध बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. रेल्वे गाड्या फलाट आदी ठिकाणी लहान लहान वस्तू विकून आपली गुजराण करणे हा या दृष्टिहीन बांधवांचा व्यवसाय. मात्र कोरोनाच्या संचार बंदी मुळे बहुतेक सर्वच घरात राहिले आहेत. या दृष्टिहीन बांधवांसाठी “दृष्टी फाउंडेशन” या संस्थेने तीन वर्षांपासून वांगणी मध्येच लघु उद्योग सुरु केले आहेत. विविध प्रकारच्या मेणबत्या, कापडी पिशव्या बनविणे आदी उद्योग या संस्थेत केले जात आहेत. गेली तीन वर्षे संस्थेच्या ‘प्रोजेक्ट जॉय स्टॉल क्राफ्ट’ योजनेअंतर्गत ही मंडळी कापडी- कागदी पिशव्या, केक मिठाईचे बॉक्स आणि निरनिराळ्या प्रकारच्या मेणबत्या बनवीत आहेत.
निसर्ग वादळामुळे रायगड जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये वीज व्यवस्था कोलमडली आहे. या अंधारात बुडालेल्या रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर मेणबत्या पाठविण्याचे कार्य या दृष्टी फाउंडेशनने केले आहे. मुंबई येथील सामाजिक संस्थांनी या दृष्टी फाउंडेशनशी संपर्क साधून मेणबत्या देऊ शकाल का असे विचारले. त्यावर त्यांनी तात्काळ होकार दिला आणि गेल्या काही दिवसांत हजारो मेणबत्या रायगड जिल्ह्यात पाठवल्या सुद्धा. त्यातही वैशिष्ठय म्हणजे मेणबत्या ना नफा ना तोटा या धर्तीवर दिल्याच, शिवाय मुंबईची संस्था सांगेल त्या ठिकाणी मेणबत्या पोहोचविल्या. जेणे करून त्या संस्थेला वांगणी पर्यंत येण्यासाठी वेळ व श्रम होऊ नये. संचारबंदीच्या काळात काही काळ हा उद्योग बंद होता. मात्र गेल्या महिन्यापासून पुन्हा मेणबत्या बनविण्याचे काम सुरू झाले आहे. याठिकाणी सात-आठ अंध पुरूष आणि महिला दिवसभर मेणबत्या बनविण्याचे काम करीत असून त्यातून त्यांचा उदर निर्वाह चालतो.
टी-लाईट प्रकारची दिसायला छोटी, परंतु दिर्घ काळ प्रकाश देणारी मेणबत्ती इथे मुख्यत्त्वे करून तयार केली जाते. या मेणबत्ती मध्ये जळताना वितळून खाली पडणारे मेण हे पुन्हा त्याच मेणबत्तीच्या वाटीत पडते आणि शेवटच्या थेंबा पर्यंत ती जळत रहाते. याशिवाय लहान-मोठ्या, निरनिराळ्या रंगाच्या, सुगंधित मेणबत्या ही मंडळी बनवितात. अहोरात्र वीज पुरवठा असणाऱ्या शहरांमध्ये मेणबत्या रोजच्या वापरासाठी लागत नसल्या तरी वाढदिवस, कँन्डल लाईट डिनर, दिवाळी, नाताळ मधील सजावटीसाठी मोठया प्रमाणात मेणबत्या वापरल्या जातात. भेट दिल्या जाणाऱ्या वस्तूंच्या संचातही एखाद-दुसरी नक्षीदार मेणबत्ती असते. दृष्टि फाऊंडेशनच्या वतीने या मेणबत्या निरनिराळी प्रदर्शनांमधून विकल्या जातात. अनेक कॉर्पोरेट कंपन्याही मेणबत्या विकत घेतात. त्यामुळे इथे सतत काम असते.
आम्ही सकाळी दहा ते सहा यावेळेत संस्थेत मेणबत्या बनविण्याचे काम करतो. इथे आम्हाला २०० रूपये मजुरी मिळते. जास्तीचे काम केले, तर जादा मोबदला मिळतो. आधी तीन महिने प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गेली दोन वर्षे मी हे काम करीत आहे असे येथील कामगार ज्योत्स्ना बर्मन,यांनी सांगितले.
आम्ही बनविलेल्या टी लाईट या मेणबत्या ज्या निसर्गवादळाने बाधित झालेल्या अंधाऱ्या गावात जाऊन पेटतात आणि उजेड देतात हे आम्हला खूप समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया मंजू रजिया यांनी व्यक्त केली.
आम्ही इकडे लाइटमध्ये राहत आहोत. पण ज्यांच्या कडे अजिबात लाईट नाहीत त्यांचे घर आमच्या छोट्याश्या मेणबत्याच्या उज्रेडात उजळून निघेल यामुळे आम्ही आनंदित आहोत असे रमेश यादव या दृष्टिहीन बांधवानी सांगितले.
संचारबंदीच्या काळात काम बंद होते. २ मे रोजी रितसर परवानगी घेऊन आम्ही मेणबत्या बनविण्याचा उद्योग सुरू केला. इथे सध्या सात ते आठ जण काम करीत आहेत. आम्ही चांगल्या दर्जाचे पर्यावरण स्नेही मेण वापरतो. त्यामुळे त्याच्या ज्वलनामुळे कोणताही अपाय होत नाही आणि पर्यावरण राखले जाते. आमच्याकडे मार्च महिन्यापासून काही ऑर्डर होत्या. मे महिन्यात त्या आम्ही पूर्ण केल्या. रायगड जिल्ह्यात निसर्ग वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्या गावात नेण्यासाठी मुंबईतील काही स्वयंसेवी संस्थांनी हजारो मेणबत्या बनविण्याची ऑर्डर दिली. एरवी आम्ही ज्या दरात विकतो, त्याच्या निम्म्या दरात आम्ही त्यांना मेणबत्या बनवून दिल्या. निसर्ग चक्री वादळामुळे उध्वस्त झालेल्या रायगडमधील गावांसाठी आमच्या तर्फेही थोडी मदत व्हावी, हा त्यामागचा हेतू असल्याचे दृष्टी फाउंडेशनचे व्यवस्थापक किशोर गोहिल,यांनी सांगितले.

 372 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.