कळवेकरांचे कोरोना संकटात पाण्यापासून प्रचंड हाल

पाण्याचे कंत्राट संपल्याने व्हॉल्व ऑपरेटर, सुल्समन यांचा पगार थांबला
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पाणी पुरवठा करण्याकरिता व्हॉल्वमन आणि सुल्समन पुरवण्याकरिता निविदा काढण्यात येते. त्या निविदांचे कंत्राट मार्च २०२० महिन्यात संपला पण अद्यापही नवीन कंत्राट काढण्यात आले नसल्याने मार्च ते जुलै पर्यंतचा व्हॉल्व मन , सुल्समन यांचा पगार थांबला आहे. यामुळे काही विभागात कामगार काम करत नसल्याने नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल सुरू झाले आहे.
कळवा प्रभाग समिती अंतर्गत सुमारे ७९ व्हॉल्वमन, सुल्समन कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. पाणी पुरवठा विभागाला पुरवण्यात येणारे व्हॉल्वमन आणि सुल्समन यांचे कंत्राट मार्च २०२० लाच संपला आहे. पण नवीन निविदा निघेल याची वाट पाहत जुलै महिना आला असून देखील ७० व्हॉल्वमनला वेतन मिळाले नाही. यामुळे कळवा प्रभाग समिती अंतर्गत काम करणारे हे व्हॉल्वमन यांनी पाणी सोडण्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना पाणी पुरवठा कमी प्रेशरने होत आहे. तर काही विभागात पाणीच मिळत नाही. यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल सुरू झाले आहे. धरणातून पाणीपुरवठा सुरळीत सुरू असून देखील पाणी पुरवठा करणाऱ्या व्हॉल्व्हमन आणि सुल्समनची निविदा संपल्याने याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. विना वेतन पाच महिने कोरोना संकटात काम करावे लागत आहे. काही परिसरात पाण्याचे व्हॉल्व्ह सोडण्याचे कामच बंद पडल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. यामुळे स्वच्छ राखा, आरोग्य संभाळा असे कोरोना काळात सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. पण नागरिकांना पुरेसे पाणीच मिळत नसल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. यामुळे ठामपा आयुक्तांनी यावर तात्काळ तोडगा काढून पाणीपुरवठा सुरळीत करणे गरजेचे असल्याचे नागरिक सांगत आहेत. दरम्यान कळवा प्रभाग समिती अंतर्गत पाण्याचा ठेका पद्धतीवर मागील कित्येक वर्षापासून सुमारे ७० व्हॉल्वमन आणि सुल्समन पाण्याच्या लाईनवर काम करत आहेत. यांना ठाणे महानगर पालिकेने कायमस्वरूपी ठामपा पाणी पुरवठा सेवेत करून घेणे आवश्यक असून कळवा परिसरात पाणी सोडण्याकरीता कंत्राटी पद्धत रद्द करून पाण्याविना नागरिकांचे हाल थांबवणे आवश्यक असल्याचे ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांनी सांगितले

कोरोना संकटात पाच महिने विना वेतन काम
पाण्याचा ठेका संपल्याने मागील पाच महिने बिना वेतन कळवा परिसरातील व्हॉल्व्हमन, सुल्समन काम करत आहेत. या कामगारांचा उदरनिर्वाह चा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

लाईटचा देखील लपंडाव
टोरंट कपंनीचा विद्युत पुरवठा कळवा परिसरात सुरू झाल्यापासून लाईटचा मोठा लपंडाव या परिसरात सुरू आहे. दिवस असो किंवा रात्र कुठलीही पूर्व सूचना न देता डायरेक्ट लाईट जात असल्याने नागरिकांना विद्युत समस्येला सामोरे जावे लागत आहे.

 349 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.