कोरोनापेक्षा वाढीव वीज बिलांची धास्ती

महावितरण कार्यालयात ग्राहकांची झुंबड : सुरक्षित अंतर राखण्याचा बोजवारा उडाला

बदलापूर : वीज बिलांच्या तक्रारी घेऊन ग्राहक मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयात धाव घेत आहेत. सलग सातव्या दिवशी ग्राहकांची बदलापूर महावितरण कार्यालयात झुंबड पहायला मिळाली. अत्यंत दाटीवाटीने ग्राहक बिलांच्या तक्रारी घेऊन रांगेत उभे होते. सारख्याच तक्रारी असल्याने महावितरणच्या अभियंत्यांकडून प्रतिसाद दिला जात नसल्याच्या तक्रारी करत ग्राहक कार्यालयात संताप व्यक्त करत होते. सुरक्षित अंतर राखण्याचा पुरता बोजवारा उडाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोनाची संचार बंदी असताना वीज ग्राहकांना महावितरणाकडून बिले दिली गेली नाही. त्यावेळी बहुतांश ग्राहकांनी सरासरी बिले भरली. मात्र टाळेबंदी उठताच आलेल्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे शहरी भागातील वीज ग्राहकांची झोप उडाली आहे. संचार बंदीमुळे उत्पन्न घटले आहे. अशा परिस्थितीत हजारो रूपयांची बिले भरायची कशी अशा तक्रारी घेऊन सोमवारी वीज ग्राहकांनी बदलापूर पश्चिमेतील महावितरणाच्या कार्यालयात एकच गर्दी केली होती.

पश्चिमेकंदील उड्डाणपुला शेजारी असलेल्या कोंदट खोल्यांमधून महावितरणाचा कारभार चालतो. गेल्या सात दिवसांपासून वीज ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. सोमवारी या गर्दीने उच्चांक गाठला. अगदी दाटीवाटीने ग्राहक रांगेत बिले हातात घेऊन उभे होते. यावेळी सुरक्षित अंतर्राखले जात नव्हते. महावितरणाचे सुरक्षा रक्षक मात्र या रांगेपासून सुरक्षित अंतर राखून उभे होते. समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्राहक कार्यालयातून बाहेर जात नव्हते. अनेक ग्राहक अनेक चक्र मार्ट होते. आणि बिलांची विचारणा करत होते. त्यामुळे मोठी गर्दी या ठिकाण पहायला मिळाली.

बदलापूर पूर्वेकंडील महावितरण कार्यालयात ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ग्राहकांना अडवून एका वेळी अवघ्या दहा ग्राहकांना कार्यालयात सोडले जात होते. त्यामुळे कार्यालयात गर्दी नसली तरी प्रवेशद्वारावर मात्र ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्शवभूमीवर महावितरण कार्यालयात होणारी गर्दी धोकादायक ठरू असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. महावितरणाने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी अनेक ग्राहकांकडून होते आहे. याबाबत महावितरणाच्या अभियंत्यांशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

 323 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.