पाऊस आणि कोरोनाशी लढण्यासाठी बदलापूरकर सज्ज

पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र सहकार्याने काम करावे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपले शंभर टक्के योगदान या पुढील काळात नगरपालिका क्षेत्रासाठी द्यावे – जगतसिंग गिरासे

बदलापूर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि पावसाळ्यात बदलापूर शहरात येणाऱ्या संभाव्य महापुराला तोंड देण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचे उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी सांगितले.
प्रशासक आणि उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोना आणि येणाऱ्या पावसाच्या काळात विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन बदलापूर पालिकेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी दीपक पुजारी, शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे, शिवसेनेचे प्रवक्ते श्रीधर पाटील, मुकुंद भोईर, भाजपचे प्रवक्ते राजेंद्र घोरपडे, भाजपचे माजी शहर अध्यक्ष संभाजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, माजी नगरसेविका. शीतल राऊत, उज्ज्वला आंबवणे, अभियंता जयेश भैरव, विवेक गौतम, डॉ. राजेश अंकुश, डॉ. हरेश पाटोळे, राजेंद्र बोरकर, प्रवीण वडगाये, दशरथ राठोड, किरण गवळे, सुरेंद्र उईके, सिद्धार्थ पवार, विलास मुठे, प्रतीक्षा सावंत आदी अधिकारी उपस्थित होते.
पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र सहकार्याने काम करावे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपले शंभर टक्के योगदान या पुढील काळात नगरपालिका क्षेत्रासाठी द्यावे असे आवाहन जगतसिंग गिरासे यांनी केले. बदलापूर सोनीवली येथे असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये जादा सुविधा देण्याबरोबरच होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांबाबत गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन या व्यक्तींना सक्तीने नियम पाळण्याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मागणी केली. तसेच चामटोली येथे असलेल्या नगरपालिकेशी करार केलेल्या एका खाजगी हॉस्पिटलला यापुढील काळात नगरपालिकेने गोळ्या, औषधे पुरवावी तसेच येथे पालिकेचे दोन अधिकारी नेमून दारिद्र रेषेखाली असलेल्या नागरिकांना मोफत सुविधा द्याव्यात. बिलासंदर्भात असलेल्या तक्रारी देखील जागेवर निरासन व्हावे अशी मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली. ते रुग्णालय खाजगी असले तरी शासनाने चालवायला घेतलेले आहे. परिणामी शासनाच्या सूचनांचे पालन करणे त्या रुग्णालयाला बंधनकारक असल्याचे जगतसिंग गिरासे यांनी स्पष्ट केले. ते ऐकत नसतील तर त्यांना नोटीस बजावण्याच्या सूचनाही गिरासे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पूर्वेकडील पेंडुलकर सभागृहात कोरोनटाईन सेंटर सुरु करण्याचा प्रयत्न आहे असे कळले आहे. हे सभागृह मध्यवर्ती ठिकाणी असून ते त्या दृष्टीने लहान असल्याचे शीतल राऊत यांनी निदर्शनास आणून दिले. त्यापेक्षा शहराच्या वेशीवर काही मोठी सभागृहे आहेत त्याचा वीचार करावा अशी सूचनाही शीतल राऊत यांनी केली. त्यांना वामन म्हात्रे, राजेंद्र घोरपडे, संभाजी शिंदे यांनी अनुमोदन दिले. पालिका प्रशासनाचा त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे. बदलापूर गावात असलेले त्याच प्रमाणे पूर्वेकडील सभागृह घेण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नये असे प्रयत्न आहेत. मात्र रुग्ण वाढले तर त्यादृष्टीने प्रशासन तयारीत असल्याचे गिरासे यांनी सांगितले.
राज्यशासनाने अनलॉक केल्यानंतर नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत. या काळात कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असून नागरिकांनी स्वतः सतर्क राहून सर्व नियम पाळून आपले काम करावे. तसेच आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. बदलापुरात पावसाच्या काळात महापूर येण्याचा देखील धोका असतो. गेल्यावर्षीचा ताजा अनुभव असल्याने त्या दृष्टीने पालिका प्रशासन सज्ज ठेवण्यात आल्याचे जगतसिंग गिरासे यांनी यावेळी सांगितले.

 411 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.