बाजारात पावसाळी रानभाज्यांचे आगमन

शंभर टक्के सेंद्रीय तत्त्वाने शहरवासियांना या भाज्यांची भुरळ पडली आहे

ठाणे : पावसाळ्याच्या सुरूवातीला हिरवेगार झालेल्या रानात सत्त्वयुक्त भाज्या उगवून येतात. स्थानिक आदिवासींना परंपरेने त्या भाज्या ठाऊक असतात. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आदिवासी महिला आणि पुरूष रानातले हे सात्विक आणि पौष्टीक अन्नघटक खुडून आणतात. या भाजीच्या विक्रीतून त्यांच्या हाती चार पैसे येतात. उर्वरित भाजी ते घरी खातात. जून महिन्यात पावसाच्या एक दोन सरी पडल्या की ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वत्र रानभाज्या पहायला मिळतात. त्यांच्यातील शंभर टक्के सेंद्रीय तत्त्वाने शहरवासियांना आकर्षित केले आहे. भारींगा, शेवळा, वळकंद, टाकळा, तेलपट, कुर्डू आदी रानभाज्यांची नावे आता शहरातही अनेकांना ठाऊक आहेत. जुलै महिन्यात येणारी कंटोळी ही छोटी काटेरी फळभाजीही मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. शहरी भागात संचारबंदी असली तरी आदिवासींना रानात फिरण्यास कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे दिवसा रानभाज्या आणि रात्री चिंबोऱ्या-खेकडे पकडून शेजारील शहरात विकण्याचा त्यांचा उद्योग सुरू आहे. या महिन्या-दोन महिन्याच्या उद्योगातून त्यांच्या हाती दोन पैसे येतात. सध्या ‘करोना’ संकटामुळे प्रतिकार शक्ती वाढविण्याचा मुद्दा ऐरणीवर आल्याने या रानभाज्यांचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
गेली काही वर्षे मुरबाडमध्ये श्रमिक मुक्ती संघटनेच्या वतीने निसर्ग देवाची यात्रा भरवली जाते. त्यात परिसरात मिळणाऱ्या रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात येते. कल्याण, ठाणे शहरातही संस्थेच्या वतीने रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सव भरविण्यात आले. त्यामुळे नव्या पिढीतील गृहिणींना रानभाज्यांचे महत्त्व समजण्यास मदत झाली. यंदा संचारबंदीमुळे अशा प्रकारची प्रदर्शने आणि महोत्सव भरविण्यात आले नसले तरी सुरक्षित वावर राखून या भाज्यांची विक्री सुरू आहे.

 494 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.