कल्याण पश्चिममधील बकरा बाजार तातडीने बंद करण्याची मागणी

विरोधी पक्षनेते, पशु संवर्धन मंत्री जिल्हाधिकारी व आयुक्तांना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिले निवेदन

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात दर मंगळवारी व शनिवारी बकरा बाजार भरवला जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात जास्त लोक एकत्र येण्यास बंदी असतानाही हा बाजार सुरू आहे आणि मुंबई व इतर परिसरातील बकरा बाजार बंद असल्याने बाहेरच्या शहरातूनही बकरे खरेदीसाठी प्रचंड गर्दी सदर ठिकाणी होत आहे. कल्याण पश्चिममध्येही कोरोना रुग्ण वाढत आहेत, त्यामध्ये या बेकायदेशीर बाजारामुळे मोठा धोका असल्याने सदर बाजार तातडीने रद्द करा अशी मागणी माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, पशु संवर्धनमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कडोंमपा आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी व पोलीस आयुक्त फणसाळकर यांना निवेदन दिले आहे. ज्या परिसरात हा बाजार भरत आहे. त्या परिसरात कोरोना बाधित रुग्णही आढळून आले आहेत व प्रशासनाने त्याला कंटेंमेंट झोनही जाहीर केला आहे. जवळच फोर्टीस हॉस्पिटलसुद्धा आहे. अशा परिस्थितीत सदर बाजार असाच सुरू राहणे हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. प्रशासनाने दिलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन त्याठिकाणी होताना दिसत नाही यावर कारवाई करून तातडीने निर्णय घ्यावा अशीही मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 546 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.