औद्योगिक वसाहतींमध्ये अर्जांचा ढीग
ठाणे : गेले तीन महिने संचारबंदीमुळे घरी बसून असलेल्या येथील हजारो खाजगी नोकरदारांनी मुंबईला ये-जा करण्याचा नाद सोडून देत स्थानिक स्तरावरच पर्यायी उपजिविकेचे साधन शोधण्यास सुरूवात केली आहे.
तीन महिन्यानंतर गेल्या आठवड्यात मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी उपनगरी रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी सुरू झाली. मात्र लाखोंच्या संख्येने प्रवास करणाºया खाजगी नोकरदारांना अद्यााप रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मुंबई महानगर प्रदेशातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तशी परवानगी लवकरच मिळण्याची शक्यताही नाही. अशा परिस्थितीत उपलब्ध असलेली बस वाहतूक सेवा अथवा स्वत:च्या खाजगी वाहनाने प्रवास करणे हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत. रस्ते वाहतुकीचा त्रास आणि होणारा खर्च विचारात घेता दररोज असा प्रवास करणे अनेकांना शक्य नाही. मुंबईत असंघटीत क्षेत्रात खाजगी नोकऱ्या करणाऱ्यांचे सरासरी मासिक वेतन १५ ते २५ हजारांच्या घरात आहे. कल्याण-बदलापूर परिसरातून दररोज मुंबईला ये-जा करण्यासाठी होणारा खर्च आणि त्रास लक्षात घेता अशा नोकरीला राम राम करून स्थानिक परिसरात पर्यायी नोकरी-व्यवसाय पत्करलेला बरा अशा विचाराप्रत ही मंडळी आली आहेत. अंबरनाथ येथील औद्योगिक वसाहतीत सध्या दररोज अशा उमेदवारांचे शेकडो अर्ज येत आहेत. त्यात इंजिनिअर ते दहावी उत्तीर्ण अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्यांचा समावेश आहे. अंबरनाथमध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योग संकुल नसूनही आय.टी. क्षेत्रातील अनेकांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत. ठाणे जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, अंबरनाथ येथे हजारो कारखाने, कंपन्या आहेत. संचारबंदीच्या काळात कंपन्या बंद असल्याने हजारो परप्रांतीय कामगार आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. त्यात वेल्डर, फिटर, मशिनिस्ट अशा विशिष्ट तांत्रिक कौशल्य असलेल्या उमेदवारांची अथवा पडेल ते काम करणाऱ्या मदतनीसांची गरज आहे. काही अवजड कामे आहेत. मात्र नोकरी मागू इच्छिणाऱ्या अर्जांपैकी बहुतेकांकडे त्या विशिष्ट प्रकारचे कौशल्य नाही. बी.ए., बी.कॉम असणाऱ्या अनेक पदवीधारकांनी अर्ज केले आहेत. त्यांच्यासाठी इथे फारशा नोकऱ्या नाहीत. मात्र कोणतेही काम करण्याची, काम शिकून घेण्याची तयारी असणाऱ्या श्रमिकांना कामे मिळू शकतील, असे ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी सांगितले. सध्या स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि ‘आमा’ संघटना यांनी संयुक्तपणे स्थानिक औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार विनीमय केंद्र सुरू केले आहे. त्याद्वारे गेल्या १५/२० दिवसात अनेकांना नोकऱ्या मिळाल्या, मात्र त्यापैकी काहींनी काम झेपत नसल्याने दोन दिवसातच नव्या नोकरीचा नाद सोडला.
524 total views, 3 views today