वायूदलाच्या ‘कमांडो’दलात निवड
शहापूर : शहापूर तालुक्यातील मळेगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील संदिप पडवळ या युवकाची नुकतीच वायूसेनेत ‘गरूड कमांडो’ पदासाठी निवड झाली असून १६ ऑगस्टपासून बेळगांवमध्ये त्याचे रितसर प्रशिक्षण सुरू होणार आहे. संदीपचे हे यश म्हणजे ग्रामीण भागातील गुणवत्ता हेरून त्यांना करिअरसाठी मदत करणाऱ्या विद्याादान सहाय्यक मंडळाच्या प्रयत्नांचे फलीत आहे.
सुतारकाम करणारे वडिल, गृहिणी आई आणि आयटीआयमध्ये ‘मशिनिस्ट’चा कोर्स करणारा धाकटा भाऊअसे संदिपचे कुटुंब. दहावीत ८१ टक्के गुण मिळवून संदिपने किन्हवलीच्या शहा चंदुलाल महाविद्याालयात वाणिज्य शाखेत अकरावीला प्रवेश घेतला. पोलीस खात्यात भरती व्हायची त्याची इच्छा होती. त्यादृष्टीने शारीरिक तंदरूस्तीसाठी तो नियमित व्यायाम करू लागला. पोलीस भरतीसंदर्भात त्याने खाजगी संस्थेमार्फत प्रशिक्षणही घेतले. दरम्यान बारावीला ७९ टक्के गुण मिळवून त्याने पदवीसाठी प्रवेश घेतला. त्यानंतर तो ‘विद्याादान’च्या संपर्कात आला. त्याची आवड आणि कल लक्षात घेऊन संस्थेतील एका कार्यकर्त्यांने त्याला पुण्यात होणाऱ्या वायूसेनेच्या ‘गरूड कमांडो’ भरतीविषयी सांगितले.
संदीपने त्या भरतीत भाग घेतला. देशभरातूून २३ हजारांहून अधिक उमेदवारांनी भरतीत भाग घेतला. चार दिवस सलग भरती प्रक्रिया सुरू होती. धावणे, लेखी परीक्षा, मुलाखत घेण्यात आली. मुंबईला वैद्याकीय चाचणी झाली. त्यातून निवडण्यात आलेल्या १७० उमेदवारांमध्ये संदिपचा समावेश आहे. संचारबंदी सुरू असतानाच ३१ मे रोजी संदिपला ही बातमी समजली. आता येत्या १६ ऑगस्ट रोजी बेळगांव येथे तो प्रशिक्षणासाठी रूजू होणार आहे.
441 total views, 2 views today