धार्मिक संस्थेकडून आरोग्यसेवेचा ‘प्रसाद’

गणेशपुरी येथील दवाखाना कार्यरत

ठाणे : करोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून लागू असलेल्या संचारबंदीमुळे इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची आबाळ होऊ लागली आहे. अगदी शहरी भागातही योग्य प्रकारे रुग्णसेवा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागात तर अधिक बिकट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतही भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी या देवस्थानातर्फे चालविल्या जाणाऱ्या प्रसाद चिकित्सा या दवाखान्यात नियमित रुग्णसेवा दिली जात आहे. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ ही आरोग्य सेवा दिली जात आहे. वसई, वाडा भागातील आदिवासींना त्यामुळे काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
संचारबंदीमुळे मंदिरासहीत सर्व प्रार्थनास्थळे बंद असली आणि दीनदुबळ्यांची सेवा हीच खरी ईश्वारभक्ती या विचाराने प्रेरित असणाऱ्या अनेक संस्था आरोग्य आणि इतर सुविधा देत आहेत. गणेशपुरी संस्थानही त्यापैकी एक आहे.
शासनाच्या आदेशान्वये गणेशपुरी येथील मंदीर बंद असले तरी प्रसाद चिकित्सा मात्र नियमितपणे सुरू आहे. या दवाखान्यात एरवी तीन डॉक्टर्स नियमितपणे ‘ओपीडी’मध्ये रुग्ण तपासून औषधे देत असतात. संचारबंदीमुळे एक डॉक्टर येऊ शकत नसले तरी दोन डॉक्टर सेवा देत आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ आणि आदिवासींना सर्दी, खोकला, ताप आणि इतर आजारांवर औषधोपचार मिळत आहे. सध्या या दवाखान्यात दररोज पन्नास ते साठ रुग्ण तपासणीसाठी येत असल्याची माहिती गणेशपुरी संस्थानचे सरव्यवस्थापक मिलिंद नरगुंड यांनी दिली. त्यामुळे सर्वसामान्य आजार असणाऱ्या रुग्णांबरोबरच मानसिक आजार, मधुमेह, रक्तदाब, क्षयरोग, एच.आय.व्ही. यांसारखे आजार असणाऱ्या परिसरातील रुग्णांनाही लॉकडाऊनच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. या व्यतिरिक्त या केंद्रात मुंबई-ठाणे परिसरातील विशेषतज्ज्ञ नियमितपणे ठराविक दिवशी भेट देत असतात, मात्र करोना संचारबंदीच्या काळात ही सेवा बंद आहे.
आरोग्य सेवेबरोबरच परिसरातील ग्रामीण भागात ‘करोना’ विषयक जनजागृती आणि जीवनावश्यक वस्तूंची मदतही संस्थेमार्फत दिली जात आहे. संस्थेने आतापर्यंत या भागातील एक हजार कुटुंबांना किमान १५ दिवस पुरेल इतके किराणा सामान दिले आहे. त्याचबरोबर सुती कापडापासून बनविलेले धुवून पुन्हा वापरता येण्याजोगे मास्कही घरोघरी दिले. वाडा तालुक्यातील अंबरभुई, कोशिमशेत, गायगोठा, सायवन, लेंडी, खैरी, वडघर, भिवंडी तालुक्यातील वर्जेश्वारी, अकलोली इत्यादी गावपाड्यांमध्ये आतापर्यंत अतिशय शिस्तबध्द पध्दतीने वाटप केले गेले आहे. गरजू कुुटुंंबे शोधून त्यांना मदत करण्याची प्रक्रिया यापुढेही सुरू राहणार असल्याचे संस्थेने कळविले आहे.

 495 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.