शहर सार्वजनीकचा यंदा “कोरोना हर्ता” गणराय

शाडूच्या मातीची तीन फुटी मूर्ती

अंबरनाथ : नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या अंबरनाथ शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे यंदाचे वैशिष्ठय म्हणजे शाडूच्या मातीची तीन फुटी मूर्ती तयार होत आली असून यंदा श गणराय हा हातात शस्त्र घेऊन कोरोनाला पायदळी तुडवून, त्याचे हरण करणारी आहे. संपूर्ण जगाला कोरोनाच्या महामारीपासून मुक्ती मिळावी अशी श्रद्धा, कल्पना आणि भावना असल्याचे शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अजय चेरिवेल्ला राव आणि जनरल सेक्रेटरी राजेंद्र परोळसांदे यांनी सांगितले आहे. दरम्यान शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गतवर्षीची कार्यकारिणी कायम करण्यात आली आहे. यंदाचे उत्सवाचे ६८ वे वर्ष आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत व सरकारी आदेशाचे काटेकोर पालन करीत, कोणताही जल्लोष अथवा बडेजाव न करता सामाजिक भान व सामाजिक अंतर राखून अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय अंबरनाथ शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतलेला आहे. कोरोनामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून येत्या वर्षीच्या उत्सवाबाबत चर्चा केली. त्यात गेल्यावर्षीच्या कार्यकारिणीत किरकोळ बदल करून तीच कायम करण्याचे निश्चित करण्यात आले. कोरोनाच्या पार्शवभूमीवर सुरक्षित अंतर राखून उत्सव साजरे करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अजय राव यांनी सांगितले. संपूर्ण अंबरनाथ शहरातील आगळा वेगळा असलेला आणि तमाम अंबरनाथकरांच्या सहकार्याने साजरा होणारा उत्सव अत्यंत साधेपणाने दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येईल, असाही निर्णय मंडळाने घेतला आहे.
अंबरनाथ शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे ६८ वे वर्ष असून सरकारी मार्गदर्शक तत्वानुसार उत्सवमूर्ती लहान म्हणजे फक्त तीन फूट उंचीची व संपूर्णपणे शाडू मातीने बनवलेली आहे. अंबरनाथ शहरातील जुने मूर्तिकार नाना कडू यांनी हि मूर्ती साकारली आहे. यावर्षीचा उत्सव देखील मंडळाचे अध्यक्ष अजय राव चिरीवेल्ला यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याचे मंडळाचे जनरल सेक्रेटरी राजेंद्र परोळसांदे यांनी सांगितले.
साधारण १९५२ साली शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. अगदी सुरुवातीला चौकात उत्सव साजरा करण्यात येत असे. कालांतराने म्हणजे साधारण १९७५ ते १९७८ च्या काळात पूर्वेला पालिकेने यशवंतराव चव्हाण खुले नाट्यगृह निर्माण केले. त्यावेळेपासून या खुल्या नाट्यगृहातच हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असे. त्याकाळात या उत्सवाची सजावट पहावयास आणि दर्शनासाठी भाविकांची भली मोठी रांग लागत असे. केवळ अंबरनाथच नव्हे तर कर्जत कसारा ते ठाण्याहून या उत्सवाला भेट देण्यासाठी भाविक येत असत. ६८ वर्षांची हि परंपरा आजही कायम आहे. यशवंत झोमण(शेठ) यांनी अनेक वर्ष या मंडळाच्या अध्यक्ष पदाची धुरा यशस्वी पणे सांभाळली होती. त्यानंतर मधुकर भोईर यांनी काही वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. गेल्या तीन वर्षांपासून अजय राव हे अध्यक्ष आहेत.
दर वर्षी त्या त्या वातावरणानुसार आणि परिस्थिती नुसार उत्सवाचे स्वरूप हे या गणेशोत्सवाचे वैशिष्ठय आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती करणारी सजावट करणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करून मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करणे आदी उपक्रम या मंडळाद्वारे राबविले आहेत. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती च्या प्रथेप्रमाणे येथेही महिलांच्या पुढाकाराने सामुदायिक गणपती अथर्वशीर्ष पठण हा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात येत असे.

कोरोना योध्द्यांचा सन्मान
यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ठय म्हणजे दहा दिवस रोज सकाळ संध्याकाळ कोरोना योध्द्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यात पालिका, पोलीस, आणि डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असेल असे मंडळाचे जनरल सेक्रेटरी राजेंद्र परोळसांदे यांनी सांगितले.
सन २०२० ची मंडळाची कार्यकारिणी

अध्यक्ष : अजय राव चिरीवेल्ला; कार्याध्यक्ष : प्रकाशचंद्र माने, शोभा शेट्टी; जनरल सेक्रेटरी : राजेंद्र परोळसांदे; उपाध्यक्ष : वृंदा पटवर्धन, दिलीप झोपे, संतोष दबडे, एकनाथ चौधरी; सेक्रेटरी : सोनाली भोईर, राघवेंद्र हेरकल, दत्तात्रय पटवर्धन, सचिन वैद्य; अंतर्गत हिशोब तपासणीस : भगवान सासे; श्रींचे आगमन विसर्जन समिती : ह.भ.प. राम फणसे; श्रींची कायम सेवा : रविन्द्र गाडगीळ; संकल्प कार्यप्रमुख : विजयन नायर; आवर्तन संयोजन समिती : दर्शना चिरीवेल्ला, हेमलता गांगल.

 497 total views,  4 views today

Leave a Reply

Your email address will not be published.