कोरोना मृतांचे आकडे लपविण्यामागे राजकीय बदमाशी – किरीट सोमय्या

कळवा रुग्णालय म्हणजे आंधळ दळतंय कुत्रं पिठं खातंय – निरंजन डावखरे

ठाणे : कोरोना मृतांची संख्या लपविण्याचा ठाणे महापालिका प्रयत्न करीत असून, महापालिकेने मुंब्रा येथे जाहीर केलेल्या मृतांच्या संख्येत मोठा फरक आहे. आम्ही कोरोना नियंत्रणात आणला असल्याचे दाखविण्यासाठी राजकीय नेत्यांची ही बदमाशी आहे, असा आरोप भाजपाचे ठाणे प्रभारी किरीट सोमय्या यांनी आज येथे केला. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची `आंधळ दळतंय कुत्रं पिठं खातंय’, अशी स्थिती झाली असून, तेथील ढिसाळ कारभारावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली.
कोरोनामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीबाबत आढावा घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सिंघल यांची भाजपाच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली. तसेच शहरातील गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले. या बैठकीला सोमय्या यांच्याबरोबरच भाजपाचे आमदार संजय केळकर, भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, नगरसेवक संदीप लेले, नारायण पवार, मनोहर डुंबरे, सुनेश जोशी, कृष्णा पाटील आदींसह नगरसेवक-पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे सरकारने कोरोनाचे ३ हजार मृत्यू दडपले आहेत. त्यातील १५०० मृत्यूंची कबूली दिली. ठाणे महापालिका क्षेत्रातही मृतांची संख्या वाढत आहे. मात्र, ठाणे महापालिकेकडून किमान ५० मृत्यूची संख्या कमी दाखविली आहे, याकडे बैठकीत आयुक्त सिंघल यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी राज्य सरकारकडे आज अहवाल पाठविणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यावरून आकड्यांची लपवालपवी सुरू असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील ढिसाळ कारभाराकडे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले. रुग्णाबाबत साधी माहितीही कर्मचारी देत नसल्याने नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यापूर्वीही अशाच पद्धतीने अकार्यक्षम कारभार होत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे याबाबत महापालिकेने गंभीर दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली. कोरोना रोखण्याच्या मोहिमेतून गरोदर महिला, आजारी शिक्षक व ५५ वर्षांवरील शिक्षकांना वगळण्याबरोबरच शिक्षकांना पीपीई किट देण्याची मागणीही डावखरे यांनी केली.
१०२४ खाटांच्या रुग्णालयात औषधांसह जादा डॉक्टरांची नियुक्ती करावी, कोविडविरोधात प्रभावी ठरलेल्या रेमडेसिवीर व सिप्ला कंपनीने तयार केलेल्या टॉसिलिझुमब (एक्टेमरा) इंजेक्शनची महापालिकेने खरेदी करावी, ऑक्सिजन सिलिंडरमध्ये २० टक्के साठा राहिल्यास अपुरा दाब होत असल्यामुळे अद्ययावत ऑक्सिजन किटसह सिलिंडरचा पुरेसा साठा ठेवावा, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ३ हजारांवरून १० हजार रुपयांपर्यंत वाढ करावी, जवाहरबाग स्मशानभूमीत मृतदेह दहनासाठी पाच तासांची प्रतिक्षा करावी लागत असल्याने, शहरातील अन्य स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीचाही वापर करावा, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणाऱ्या कोविडच्या प्रत्येक रुग्णाची कोरोना टेस्ट करावी, क्वारंटाईन केलेल्या नागरिकांचीही टेस्ट करावी, प्रत्येक रुग्णावर रुग्णालयात योग्य पद्धतीने उपचार करण्यासाठी कार्यवाही करावी, आदी मागण्या भाजपाच्या शिष्टमंडळाने केल्या.
सद्यस्थितीत होम क्वारंटाईन व इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची संख्या किती, डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या, क्वारंटाईन सेंटरमधून डिस्चार्ज झालेल्या नागरिकांची संख्या, होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांची प्रकृती सुधारण्याचे प्रमाण आदी प्रश्न विचारून भाजपाने पालिका प्रशासनाकडून उत्तरे मागितली आहेत.

 523 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.