कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून अंबरनाथ पालिका स्वतंत्र करण्याच्या लढ्यात त्यांनी योगदान दिले होते
अंबरनाथ : शहरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक, ठाणे जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी उमाशंकर तिवारी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली, एक मुलगा असे कुटुंब आहे.
अंबरनाथ पालिकेची पुनर्रचना झाल्यावर १९९५ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर उमाशंकर तिवारी हे निवडून आले होते. त्या नंतर २००० मध्ये त्यांनी स्वीकृत सदस्य म्हणून काम पाहिले. अतिशय अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची ख्याती होती. १९७५ ते १९७८ च्या काळात काँग्रेसचे प्रभाकर विठ्ठल उर्फ दादासाहेब नलावडे नगराध्यक्ष असताना महाराष्ट्रातील पहिला कामगार पुतळा लादी नाका येथे बसविण्यात आला होता. हा पुतळा कालांतराने रस्ता रुंदीकरणात हटविण्यात आला. तो पुतळा पुन्हा त्याच जागी बसविण्यात यावा यासाठी उमाशंकर तिवारी आणि अनंत राजे यांनी खूप पाठपुरावा केला. प्रसंगी त्यांना संघर्षही करावा लागला. अखेर त्याजागी पुन्हा कामगार पुतळा बसविण्यात आला. सर्वसाधारण सभेत अभ्यासपूर्ण चर्चा घडवून आणणाऱ्या मोजक्या लोकप्रतिनिधींमध्ये त्यांची गणना होत होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून अंबरनाथ पालिका स्वतंत्र करण्याच्या लढ्यात त्यांनी योगदान दिले होते. त्यांच्या निधनाबद्दल ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष उमेश पाटील, सरचिटणीस राजेंद्र परोळसांदे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. यशवंत जोशी, अनंत राजे, कामगार नेते श्याम गायकवाड यांचा सह सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.
508 total views, 3 views today