अंबरनाथ-बदलापूरलाही हवा ‘आयएएस’ अधिकारी

आमदार किसन कथोरे यांची राज्यशासनकडे मागणी

अंबरनाथ : महानगर प्रदेश क्षेत्रात करोना झपाट्याने हातपाय पसरत आहे. ठाण्यापासून बदलापूरपर्यंत सर्वच शहरी भागात रुग्णसंख्या चिंताजनकरित्या वाढत आहे. स्थानिक प्रशासनांना परिस्थिती हाताळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक शहरात थेट ‘आयएएस’ दर्जाच्या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. ती निकड ओळखून नवी मुंबई, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर येथील आयुक्तांची तातडीने बदली करून त्याठिकाणी ‘आयएएस’ अधिकाऱ्यांची नेमणूक झाली. याच न्यायाने अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांसाठी विशेष बाब म्हणून आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची लोकसंख्या सुमारे सहा लाखांच्या घरात आहे. एप्रिल महिन्यात येथील लोकप्रतिनिधींची मुदत संपली. त्यामुळे दोन्ही शहरात सध्या प्रशासकीय राजवट आहे. मात्र मुख्याधिकारी आणि प्रशासकांना परिस्थिती हाताळण्यास अपयश आले आहे. त्यामुळेच दोन्ही शहरांमधील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. जेमतेम साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या अंबरनाथ शहरात बाराशेहून अधिक रुग्ण आहेत. बदलापूरमधील रुग्णसंख्याही पाचशेच्या पुढे गेली आहे. त्यामुळे ठाणे जिल्हयातील महापालिकांप्रमाणेच या दोन पालिकांसाठीही शासनाने तातडीने आयएएस दर्जाचा अधिकारी नेमावा. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी असा निर्णय घेण्याची गरज आहे, असेही कथोरे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

 739 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.