फसवणूक केल्या प्रकरणी बिल्डरला ३ वर्षाचा तुरुंगवास

११२ सदनिका धारकांकडून पैसे घेऊन गेला होता पळून
पनवेल :  पनवेल तालुक्यातील चिपळे येथे नियोजित गृहप्रकल्पातील फ्लॅट विक्रीच्या अमिषाने ११२ फ्लॅट बुकींगधारकांची फसवणूक झाली
यात ग्राहकांना तब्बल साढेचार कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी आता फसवणूक करणाऱ्या शंकर पांडुरंग नांगरे या बांधकाम व्यावसायिकाला ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पनवेल येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही शिक्षा देत ५० हजार रुपये दंडही लावला. या प्रकरणात न्यायालयाने भरडल्या गेलेल्या पीडित फ्लॅट बुकींगधारकांना त्यांच्या रक्कमेवर ६.५ टक्के व्याज देण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. या निकालामुळे सर्वसामान्यांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी शंकर नांगरे हा श्री साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचा मालक आहे. त्याने ४ वर्षापूर्वी पनवेलच्या चिपळे भागात साई अंबर रेसिडेन्सी नावाने भव्य गृहप्रकल्प उभारत असल्याची जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीला भुलून ११२ सर्वसामान्य नागरिकांनी नांगरे आरोपीच्या गृहप्रकल्पातील फ्लॅटची बुकिंग केली. फ्लॅटच्या बुकींगपोटी त्यांनी आरोपीला तब्बल ४ कोटी ५४ लाख रुपये दिले होते. मात्र त्यानंतर नांगरे याने गृहप्रकल्पाचे कुठल्याही प्रकारचे बांधकाम केले नाही. तसेच नागरिकांना त्यांच्या बुकींगची रक्कमही परत न करता पोबारा केला. खांदेश्वर पोलिसांनी नांगरे विरोधात फसवणुकीसह मोफा कलमाअन्वये गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आर्थिक गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता

 369 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.