संस्कृती युवा प्रतिष्ठानची प्रसिद्ध दहीहंडी यंदा रद्द

आयोजनाचा खर्च कोरोनासाठी वापरणार


ठाणे : यंदा सार्वजनिक गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे आणखी एक प्रमुख सण असलेला दहीहंडीचा सणही महाराष्ट्रात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. परंतु, यंदा कोरोनामुळे हा सण साजरा करणे शक्य होणार नाही. दहीहंडी उत्सव पहाणाऱ्यांची संख्याही मोठी असते. त्यामुळे या सणाच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगसह विविध नियमांचे पालन होणार नाही. सामाजिक दुरी ठेवणे गरजेचे आहे व दहीहंडी मध्ये एकमेकांचा आधार घेऊन थर लावले जातात. हजारो लोक येथे जमतात.
यंदा आपल्यापुढे कोरोना चे मोठे संकट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन यंदा संस्कृती युवा प्रतिष्ठानची प्रसिध्द दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेत असल्याचे अध्यक्ष , आमदार प्रताप सरनाईक व सचिव तसेच संयोजक पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले.
प्रो गोविंदा ही संकल्पना संस्कृती युवा प्रतिष्ठानने आणली. या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन तरुण पुढे येत असून हंडीत तब्बल ९ थरांचा जागतिक विक्रम झाला त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहे. त्यामुळे दरवर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी अतिशय उत्साहात साजरी होते. हजारो गोविंदा, नागरिक या दहीहंडीला उपस्थिती दर्शवतात. दहीहंडीचा समावेश खेळ या प्रकारात समावेश व्हावा यासाठी प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा केला आणि दहीहंडीला शासनमान्यता प्राप्त करून दिली. त्यानंतर प्रो गोविंदा सुरू केला.
दरवर्षी दहीहंडी उत्सव प्रचंड उत्साहात साजरा होतो. परंतु, सध्याची परिस्थिती लक्षात घेता हंडी रद्द करणे हेच प्रत्येकाच्या आरोग्याच्या व समाजाच्या दृष्टीने योग्य आहे.
दहीहंडी उत्सवासाठी मोठमोठी पारितोषिके देण्यात येतात. या रक्कमाही मोठ्या असतात. मात्र, हा सण साजरा करताना मोठ्या प्रमाणावर तरुण गोविंदा एकत्र येतात. जर गोविंदा उत्सवात गर्दी झाली, तर सध्या सरकार करत असलेल्या उपाययोजना फोल ठरण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार यंदा आम्ही संस्कृती प्रतिष्ठानची हंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला असून विविध प्रकारची पारितोषिके तसेच इतर नियोजनापोटी होणारा खर्च कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका तसेच इतर उपाययोजनांसाठी वापरणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. इतर गोविंदा उत्सव मंडळेही यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करून आयोजनाचा खर्च कोरोनाबाधितांसाठी वापरतील अशी आशा प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

 972 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.