महिलेच्या मृत्यूपश्चात यकृतदानाने एकास जीवदान
कल्याण : करोना संसर्गाच्या भीतीमुळे गेल्या काही दिवसांपासून ठप्प झालेली अवयव दानाची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कल्याण येथील फोर्टिज रुग्णालयात अपघातात जखमी झालेल्या एका ६१ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूपश्चात अवयवदान करण्याची तिची इच्छा होती. त्यानुसार मुलगा, सुन आणि मुलीने तिची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मुंबईतील एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला जीवदान मिळाले.
कल्याण येथील फोर्टीस रूग्णालयात अपघातात गंभीर जखमी झालेली एक ६१ वर्षीय महिला दाखल झाली होती. मात्र तिची प्रकृती खालावल्याने अखेरीस डॉक्टरानी तिला ब्रेन डेड म्हणून जाहीर केले. कुटुंबियांनी तिच्या इच्छेनुसार तिच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फोर्टिस रुग्णालयाने हालचाली करून या महिलेचे यकृत मुंबईतील एका रूग्णाला देण्याचा निर्णय घेतला. मुंबईत एका खासगी रूग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. त्यामुळे ६४ वर्षीय जेष्ठ नागरिकाला जीवदान मिळाले. फोर्टीस रुग्णालयाचे क्रिटीकल केअर विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पाटील, न्युरोलॉजीस्ट डॉ. राकेश लल्ला यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांचे पथक या कामासाठी सज्ज करण्यात आले होते.
513 total views, 1 views today