‘आदिवली’ बंधारा प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक
ठाणे : योजना राबविताना करण्यात येत असलेल्या हलगर्जीपणामुळे ठाणे जिल्ह््यात विपुल जलसाठा असूनही अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्याचे एक ठळक उदाहरण नुकतेच समोर आले आहे.
शहापूर तालुक्यातील आदिवली बंधाऱ्याच्या कालव्याच्या दुरूस्तीचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले होते. मात्र संबंधित ठेकेदाराने त्यासाठी नित्कृष्ट दर्जाचे पाईप टाकल्याचे आढळून आल्याने ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा, भातसा आदी मोठ्या धरणांबरोबरच शहापूर तालुक्यात इतरही लहान-मोठे बंधारे आहेत. स्थानिकांना शेतीसाठी या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग व्हावा, या हेतूने चार दशकांपूर्वी लघुपाटबंधारे विभागाने हे बंधारे बांधले. त्यांना पाझर तलाव असेही म्हटले जाते. आदिवली गावाजवळील बंधारा त्यापैकीच एक. त्याला पाझर तलाव म्हटले जात असले तरी हे एक छोटे मातीचे धरणच आहे. अष्टे. मानेखिंड, चरीव आदी गावातील सुमारे २०० हेक्टर जमीन त्यामुळे ओलिताखाली येणे अपेक्षित आहे. या धरणाला डावा आणि उजवा असे दोन कालवे असून त्याद्वारे शेतीला पाणी मिळण्याची व्यवस्था १५ वर्षांपूर्वी करण्यात आली. मात्र त्यापैकी डाव्या कालवा गेल्या १५ वर्षांपासून नादुरूस्त आहे. त्यामुळे त्या दिशेकडील गावकऱ्यांच्या शेकडो हेक्टर जमिनीला धरण जवळ असूनही पाणी मिळत नाही. परिणामी गावकऱ्यांना दुबार पिके घेता येत नाही. आता इतक्या प्रदिर्घ कालावधीनंतर गेल्या एप्रिल महिन्यात डाव्या कालव्याच्या दुरूस्तीेचे काम हाती घेण्यात आले. मात्र त्यासाठी वापरण्यात आलेले पाईप नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून येताच ग्रामस्थांनी ते काम बंद पाडले.
आदिवली बंधाऱ्याच्या डाव्या कालव्याच्या दुरूस्ती कामात हलगर्जीपणा आढळून आल्याने आम्ही काम थांबवले. बऱ्याच वर्षानंतर दुरूस्ती होत असल्याने ती व्यवस्थित व्हावी, इतकीच आमची माफक अपेक्षा आहे, असे स्थानिक शेतकरी मनोहर वेखंडे यांनी सांगितले.
पाटबंधारे विभागाने मात्र गावकऱ्यांचा हा दावा फेटाळला आहे. बऱ्याच काळानंतर बंधाऱ्यांच्या डाव्या कालव्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रत्यक्ष जागेवर काही खोदकाम करण्यात आले असले तरी प्रत्यक्ष कामाला अद्यााप सुरूवात झालेली नाही. त्यामुळे काम नित्कष्ट दर्जाचे झाल्याच्या ग्रामस्थांच्या दाव्यात काहीच तथ्य नाही. आता पावसाळ्यानंतर योग्य त्या पद्धतीने कालव्याचे काम पूर्ण केले जाईल, असा दावा पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.
आदिवली धरण परिसरात घनदाट जंगल आहे. या निसर्गरम्य परिसराचा उत्तम पर्यटन केंद्र म्हणून विकास करता येईल. धरणाचे पात्र विशाल असून त्यात साचलेला गाळ काढल्यास फार मोठ्या प्रमाणात अतिरिक्त जलसाठा होऊशकतो. कधीही न साकारू शकणाऱ्या नव्या, प्रस्तावीत धरणांचा आग्रह सोडून शासनाने अशा प्रकारच्या छोट्या धरणांचै विस्तारीकरण आणि बळकटीकरण केले तर स्थानिक परिसरातील नागरिकांना शेती आणि पिण्यासाठी मुलबक पाणी मिळू शकेल, असे मत जलसंधारण क्षेत्रातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.
528 total views, 1 views today