भारताने चीनच्या विरोधातील जागतिक स्तरावरील रोषाचा लाभ करून घ्यावा

       भारत सामरिकदृष्ट्या अजिबात कमकुवत नाही. लडाखमध्ये भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना प्रत्युत्तर देऊन ते दाखवून दिले आहे. त्यामुळे प्रत्येक भारतियाने भारतविरोधी संदेश पुढे न पाठवता त्याविषयी पोलिसांना कळवा – आर्.एस्.एन्. सिंह, ‘रॉ’चे माजी अधिकारी

मुंबई : कलम ३७० हटवल्यानंतर भारताची गिलगिट-बाल्टिस्तानवर पकड आली आहे. भारताच्या भूमिकेमुळे ‘चीन-पाकिस्तान कॉरिडॉर’लाही अडथळा निर्माण झाला आहे. या दृष्टीकोनातून सध्या लडाखमध्ये उद्भवलेल्या प्रश्‍नाकडे पाहिले पाहिजे. तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांनी निवडणुकीपूर्वी चीनच्या दबावाला भीक न घालता स्वतंत्र तैवानची घोषणा केली होती. दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेने जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्या सुरक्षेचे दायित्व घेतले आहे. आशिया-पॅसिफिक प्रांतात अमेरिकेच्या वर्चस्वाला थोपवण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. याच काळात चीनमधून कोरोनाचा प्रसार झाला. हे चीनने पुकारलेले जैविक युद्ध आहे. उत्तर कोरिया आणि पाकिस्तान हे देश सोडले, तर चीन जगात एकटा पडला आहे. आताची भू-राजकीय स्थिती भारताच्या बाजूची आहे. भारताने स्वसामर्थ्य ओळखून त्याचा लाभ करून घ्यायला हवा, असे आवाहन सुरक्षातज्ञ आणि ‘रॉ’ अन् ‘मिलिटरी इंटेलिजन्स’चे माजी अधिकारी आर्.एस्.एन्. सिंह यांनी केले.

ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ जून या दिवशी ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ऑनलाईन कार्यक्रमात ‘भारताची सुरक्षा आणि चीनचा बहिष्कार’ या विषयावरील विशेष संवादात बोलत होते. या कार्यक्रमात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन, भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय महासचिव अनिल धीर, तसेच सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते  चेतन राजहंस यांनीही संबोधित केले. ‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब’ यांच्या माध्यमांतून प्रसारित झालेला हा ऑनलाईन कार्यक्रम जवळपास ४० हजार लोकांनी पाहिला, तर फेसबूकच्या माध्यमातून १ लाख १३ हजार लोकांपर्यंत विषय पोचला.

भारतातील काही चिनीप्रेमींना हाताशी धरून ‘भारत चीनपेक्षा दुबळा आहे’, अशा प्रकारचा दुष्प्रचार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सरकार आणि सैन्य स्तरावर याचा परिणाम होत नसला, तरी काही प्रसिद्धीमाध्यमे आणि चीनची बाजू घेणारे कथित तज्ञ यांमुळे सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. वास्तविक भारत सामरिकदृष्ट्या अजिबात कमकुवत नाही. लडाखमध्ये भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना प्रत्युत्तर देऊन ते दाखवून दिले आहे. त्यामुळे प्रत्येक भारतियाने भारतविरोधी संदेश पुढे न पाठवता त्याविषयी पोलिसांना सांगितले पाहिजे, असे आवाहन निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी या वेळी केले.

चीनने लडाखमध्ये केलेली आगळीक हे आभासी युद्ध आहे. भारताच्या विरोधात युद्ध केल्यास त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम काय होऊ शकतात, याची चीनला कल्पना आहे. त्यामुळे पाकिस्तानप्रमाणे चीनचीही कुकृत्ये भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडावीत. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासह भारताने स्वयंपूर्ण होणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारत रक्षा मंचचे  अनिल धीर यांनी केले. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा चीनची सीमा भारताला लागून नव्हती; मात्र चीनने तैवान, हाँगकाँग, अक्साई चीन, तिबेट आदी भूप्रदेश गिळंकृत करून विस्तारवादी धोरण राबवले. तिबेट हा पूर्वी भारताचे अंग होता. कैलास पर्वत, मानसरोवर ही हिंदूंची श्रद्धास्थानेही तेथेच आहेत. साम्राज्यवादी चीनचा अनेक देशांशी सीमावाद आहे. अशा वेळी भारताने तिबेटला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देऊन चीनला शह द्यावा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते  चेतन राजहंस यांनी केले.

 415 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.