सर्व डॉक्टर देणार कोविड हॉस्पिटलमध्ये सेवा

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टरांचा पुढाकार

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील सर्व खाजगी डॉकटर एकत्र येऊन कोविड रुग्णालयात जास्तीत जास्त सेवा देणार असल्याचे अंबरनाथ मेडिकल असोसिएशन तर्फे आश्वासन देण्यात आले आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ७०० बेडच्या कोविड हॉस्पिटलमध्ये सेवा देण्यासाठी शहरातील सर्व डॉक्टरांनी समर्थन दर्शविले आहे. दररोज तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी तीन डॉक्टर एक – एक दिवस सेवा देणार आहेत. सरासरी ७० ते ८० डॉक्टर कोविडच्या युद्धात आपली महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. अंबरनाथ शहरातील रुग्णांना बेड उपलब्ध नाही असे यापुढे होणार नाही असे विशेष नोडल अधिकारी मेजर डॉ. नितीन राठोड यांनी सांगितले.
अंबरनाथ डॉक्टर असोसिएशनच्यावतीने पालिकेच्या रुग्णालयात सेवा देण्यासाठी खाजगी डॉक्टर देखील सज्ज झाले आहेत. आठवड्यातून एक दिवस प्रत्येक डॉक्टर आपली सेवा देणार आहे. एका दिवशी पहिल्या शिफ्टमध्ये तीन डॉक्टर, दुसऱ्या शिफ्टमध्ये तीन डॉक्टर आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये तीन डॉक्टर असे दिवसभरात नऊ डॉक्टर अखंडित सेवा देणार आहेत. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांची नवी टीम अशाच तीन शिफ्टमध्ये काम करणार आहे. प्रत्येक डॉक्टराना एक दिवस किमान या रुग्णालयात सेवा देण्यासाठी यावे लागणार आहे.
अंबरनाथ पालिकेतील कोविड नोडल ऑफिसर मेजर डॉक्टर नितीन राठोड यांच्यावतीने मंगळवारी सायंकाळी शहरातील सर्व डॉक्टरांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अंबरनाथ मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी या कोविड रुग्णालयाची पहाणी केली. यावेळी डॉ. उषा माहेश्वरी, डॉ. गणेश राठोड, डॉ. गौतम जटाले, डॉ. यतीन भिसे, डॉ. राकेश पटेल, डॉ. राहुल चौधरी, डॉ. मयुरेश वारके, डॉ. अरविंद मोरे, डॉ. श्रीकांत गरजे, डॉ. प्रमोद बाळापूरे, डॉ. आव्हाड,डॉ. कुरेशी, डॉ. टोणपे, डॉ. मोहिते आदी डॉक्टर उपस्थित होते. शहरातील डॉक्टरांनी कशाप्रकारे कोविड रुग्णालयांमध्ये सेवा द्यावी यावर चर्चा करण्यात आली. तसेच या डॉक्टरांना सुरक्षेची सर्व साधने पालिकेमार्फत पुरविले जाणार आहेत. डॉक्टरांनी कोणती सावधगिरी बाळगावी याचे प्रात्यक्षिक देखील दाखविण्यात आले. अंबरनाथ शहरातील सर्व तज्ञ डॉक्टर या बैठकीला आवर्जून उपस्थित होते.
अंबरनाथ मेडिकल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी या कोविड रुग्णालयासाठी आवश्यक असतील तितके डॉक्टर उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे. कोविडमध्ये लढण्यासाठी पालिकेने स्वतंत्र डॉक्टर घेतलेले आहेत. तरी देखील शहरातील डॉक्टर सेवा देण्यास तयार असल्याने ते शहराच्या हिताचं होईल अशी प्रतिक्रिया कोरोना विशेष नोडल अधिकारी मेजर डॉ नितीन राठोड यांनी व्यक्त केली. या सुविधेमुळे यापुढे रुग्णांना बेड उपलब्ध नाही असे होणार नाही असा विश्वास मेजर डॉ. नितीन राठोड यांनी व्यक्त केला.
या रुग्णालयात सर्वच तपासणीची सुविधा असून ती विनामूल्य आहे. यामध्ये आणखीही काही अडचण आल्यास अंबरनाथ मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी आपली सेवा देणार आहेत. अंबरनाथ शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ती संख्या आटोक्यात आणण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो असल्याचे अंबरनाथ मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉ. गणेश राठोड यांनी सांगितले.

 892 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.