उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाची मागणी
बदलापूर : रेल्वेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केली आहे. मात्र या लोकलना कर्जत कल्याण मार्गावर वांगणीसह तीन स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागातील कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत असून ही गैरसोय टाळण्यासाठी कर्जत ते कल्याण दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देण्याची मागणी होत आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे माजी अध्यक्ष व उपनगरीय रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य मनोहर शेलार यांनी केली आहे.
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष लोकल सेवा सुरू केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र कर्जत-कल्याण मार्गावर लोकल सेवा सुरू करताना भिवपुरी, शेलू व वांगणी या स्थानकांवर थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागात राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रस्ते मार्गाने सुमारे १२ किमी अंतर कापून बदलापूर किंवा नेरळ रेल्वे स्थानक गाठावे लागते. यासाठी लागणारा वेळ व खर्च पाहता ते या कर्मचाऱ्यांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे या मार्गावर अन्य वाहुतक व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे या प्रवाशांची होत असलेली गैरसोय पाहता कर्जत ते कल्याण दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
एकट्या वांगणीमध्ये अत्यावश्यक सेवेतील १५७ कर्मचारी असुन त्यापैकी सुमारे २५ कर्मचारी अंध, अपंग आहेत. त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी नियमितपणे रेल्वे लोकल सेवा सुरू असताना कर्जत ते कल्याण दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा होता. आता फक्त मोजक्याच लोकल सेवा सुरू असताना या तीन स्थानकांचा थांबा वगळून काय साध्य होणार आहे? असा या भागातील नागरिकांचा सवाल आहे.
दरम्यान, कर्जत ते कल्याण दरम्यान व कसारा ते कल्याण दरम्यान सर्व स्थानकांवर लोकल थांबा द्यावा, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे तसेच खासदार कपिल पाटील व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आमदार राम कदम यांनीही या प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठविण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे माजी अध्यक्ष व उपनगरीय रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य मनोहर शेलार यांनी दिली आहे.
555 total views, 1 views today