सत्संग परिवाराचा सक्रिय सहभाग : झपाटून कार्य सुरु
अंबरनाथ : शहापूर तालुक्यातील बळीराजा मेहनती आहे. मात्र या तालुक्याला कायम पाणी टंचाईची समस्या जाणवत असते. त्यामुळे बळीराजा इच्छा असूनही बारमाही शेती करू शकत नाही. हे लक्षात घेऊन या तालुक्यातील पाणी टंचाई कमी करून हरितक्रांती करण्याचा जणू संकल्पच सत्संग परिवाराचे प्रमुख फुलनाथ बाबा यांनी केल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातून वहाणारे नदी नाले यांची खोली आणि रुंदी वाढवून भूजल पातळी वाढवण्यासाठी हा परिवार तन, मन आणि धनाने कार्य करीत आहेत. अक्षरशः झपाटून हा परिवार कार्य करीत आहे. आणि त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. दोन दिवसांच्या पावसात पाणी साठा वाढलेला पहावयास मिळाला आहे.
चांगले काम हीच ईश्वाराची आराधना हा अध्यात्म विचाराचा मूळ गाभा प्रत्यक्षात आणत शहापूर तालुक्यातील सत्संग परिवाराने परिसरातील शेकडो गावपाड्यांच्या पाचवीला पुजलेली पाणी टंचाई दूर करून बाराही महिने शेती करता येईल असे कार्य करण्याचा निर्धार केला आहे. शहापूरमधील टाकी पठार येथील फुलनाथ बाबा यांचे शहापूर, मुरबाड, कर्जत आदी तालुक्यात हजारो शिष्यगण आहेत. आपल्या भोवतालची परिस्थिती बदलायची असेल, तर त्याची सुरूवात स्वत:पासून करायला हवी, या भावनेने यंदा फुलनाथबाबा यांनी स्वत: त्यांच्या शिष्यगणांसहीत शहापूर तालुक्यातील भूजल पातळी वाढवणायचे काम हाती घेतले आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यापासून या सत्संग परिवाराने फुलनाथ बाबांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरातील नाल्यातील गाळ उपसा मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे या मोहीमेसाठी लागणारा सर्व खर्च भक्तांनी दिलेली वर्गणी, देणगी आणि मठातील निधीतून भागवला गेला. गेल्या सहा महिन्यातील या तपश्चर्येचे फळ म्हणजे येत्या पावसाळ्यात शहापूरमध्ये कोट्यवधी लिटर्स जादा पाणीसाठा होणार आहे. त्याच प्रमाणे नदी नाल्यातून वाहून येणारा गाळ यंदा वाहून न आल्याने होणारे पिकाचे नुकसानही टळणार आहे.
शहापूर तालुक्यात मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा, भातसा या सारखी मोठी धरणे असूनही येथील शेकडो गावांमध्ये उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई भेडसावते. खरे तर तालुक्यातील सिंचन आणि पाणी पुरवठ्यासाठी मुसोई, आदिवली सारखी छोटी धरणे, पाझर तलाव आहेत. याशिवाय शासनाने नैसर्गिक ओढे, नाले आणि नद्याांवर बंधारे बांधले आहेत. मात्र देखभाल दुरूस्ती नसल्याने बहुतेक बंधाऱ्यांचा जल संचयनासाठी उपयोग होत नाही. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ टाकी पठार येथील मठात असलेल्या फुलनाथ बाबांना ही वस्तुस्थिती माहिती आहे.
तहसीलदार, वन विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून रितसर परवानग्या घेऊन फुलनाथ बाबानी सत्संग परिवाराच्या माध्यमातून शहापूरमधील विविध नाले तसेच नदी पात्रातील गाळ काढण्याची मोहीम सुरू केली. डिसेंबर महिन्यापासून सलग ही मोहीम सुरू होती. ९ डिसेंबर २०१९ रोजी सत्संग परिवाराच्या वतीने गाळ काढण्याची मोहीम सुरू झाली. परिवाराने एक जेसीबी भाडे तत्वावर घेतला. या मोहीमेत आता पर्यंत आदिवली, अष्टे, भर्डेपाडा, भोईपाडा, चिखलगांव, मानेखिंड, वाचकोळे, मुसई, पाचघर, वेहळोली मुका ओहोळ आदी ठिकाणचा गाळ उपसून झाला आहे. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व कामगारांना दररोज त्यांची मजुरी दिली गेली. या व्यतिरिक्त सकाळी नाश्ता, पिण्याचे पाणी, दुपारचे जेवण मठावरून कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवले जात होते. तालुक्यातील शिष्यगण आपले काम सांभाळून या मोहिमेला हातभार लावत होते. कोरोना संकटामुळे संचारबंदी लागू होईपर्यंत ही मोहीम सुरू होती. फुलनाथ बाबा त्यांच्या तरुणपणी शासकीय सेवेत कृषि सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या अनुभवाचा फायदा या मोहीमेत होत आहे. पावसाळ्यानंतर पुन्हा ही मोहीम हाती घेतली जाणार आहे.
शहापूर तालुक्यातील सर्व ओढे आणि नाल्यांमधील गाळ उपसून परिसरातील शेतकऱ्यांसाठी मोठया प्रमाणात शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. संपूर्ण शहापूर तालुका हिरवा करण्याचा आमचा निर्धार आहे. ओढे आणि नाल्यातील गाळ काढल्याने पाण्याला दिशा मिळून ते वहाते रहाणार आहे. या वहात्या पाण्यावर बंधारे बांधले असल्याने पाणी ठिकठिकाणी अडवले जाईल. परिणामी भूजल पातळी वाढेल. त्याच बरोबर एरवी नाले गाळाने भरल्यामुळे वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर दगड धोंडे आणि गाळ आजूबाजूच्या शेतात आल्याने शेत पिकासाठी अयोग्य होत असे. आता तसे होणार नाही आणि शेती गाळापासून मुक्त झाल्याने बळीराजाला चांगले पीक घेता येईल असा विश्वास सत्संग परिवाराचे फुलनाथ बाबायांनी व्यक्त केला आहे.
514 total views, 1 views today