कोरोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या पोलिसांचा ‘आपत्ती सेवा पदकाने’होणार गौरव

पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी त्यांना सन्मानित करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यात सर्वत्र पातळ्यांवर पोलीस प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जिवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत. त्या सर्व पोलिसांचा यथोचित सन्मान ‘आपत्ती सेवा पदक’ देऊन करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील पोलीस दल मागील तीन महिन्यांपासून राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच जनमानसात सुरक्षा व सामाजिक बांधिलकी रहावी यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. लोकांची सुरक्षा ते सुरक्षितता इथंपर्यंतची सर्व कामे पोलीस करीत आहेत.

लॉकडाऊनमध्ये लोकांना अगदी मास्क लावा असे समजावून सांगण्यापासून ते सामाजिक अंतर राखण्यास प्रवृत्त करण्यापर्यंतची सर्व कामे पोलिसांनी केली आहेत. परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी देखील पोलिसांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

कर्तव्य बजावत असताना पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यासही न डगमगता आपल्या पोलीस बांधवांनी आपले कर्तव्य सुरूच ठेवले. दुर्दैवाने ४२ पोलीस बांधवांना यात वीरगती प्राप्त झाली.

राज्यातील पोलीस बांधवांना सन्मानित करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी गृह विभागातर्फे आपत्ती सेवा पदक देऊन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान व गौरव करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री देशमुख म्हणाले.

 341 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.