राज्‍य सरकारच्‍या अर्धवट आदेशाने सरकारी कर्मचाऱ्यांची कुचंबणा

रेल्‍वेने करता येत नाही प्रवास

ठाणे : सरकारी व आपत्‍कालिन सेवांसाठी रेल्‍वे मंत्रालयाने रेल्‍वे सुरू केली खरे पण यातुन कुणी प्रवास करायचा याबाबत राज्‍य सरकारच्‍या अर्धवट आदेशाने अनेक राज्‍य सरकारी, निमसरकारी कर्मचारी रेल्‍वेतुन प्रवास करण्‍याच्‍या सुविधेपासुन वंचित राहत आहेत. आरटीओ व उल्‍हासनगर महानगरपालिकेसह अनेक सरकारी व निमसरकारी कर्मचारयांना राज्‍य शासनाच्‍या या आदेशामुळे प्रवासासाठी फरपड सहन करावी लागत आहे. आरटीओतील कर्मचारी तर एसटीने प्रवास करून रेल्‍वे स्‍थानकावर आपत्‍तकालिन सेवा बजावत आहे. रेल्‍वे स्‍थानकावर काम करायचे मात्र रेल्‍वेने प्रवास करायचा नाही असा अजब प्रकार पहायला मिळत आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्‍या हद्दीत राहत असलेल्‍या आप्‍तकालिन तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक सुरळित व्‍हावा म्‍हणून रेल्‍वे मंत्रालयाने रेल्‍वे सुविधा उपलब्‍ध करून दिली आहे. ही सुविधा कुणी वापरावी याबाबतचे निर्णय राज्‍य शासनाने घ्‍यायचे आहेत. राज्‍य शासनाच्‍या परिपत्रकाच्‍या आधारावर रेल्‍वे स्‍थानकावर रेल्‍वेने कुणीकुणी प्रवास करावा याबाबतच्‍या सुचना सुचना फलकावर लावण्‍यात आल्‍या आहेत. या सुचनांमुळे अनेक राज्‍य सरकारी कर्मचारयांचीच कुचंबना होत असल्‍याचे दिसुन येत आहे.

मुंबई, ठाणे, वसई, कल्‍याण, मीरा भाईंदर,मुंबई पोलिस, बेस्‍ट,मंत्रालय व सर्व सरकारी व खाजगी रूग्‍णालयातील कर्मचारी यांनाच फक्‍त रेल्‍वेने प्रवास करण्‍याची सुविधा देण्‍यात आल्‍याचे रेल्‍वे स्‍थानकावर लावलेल्‍या सुचना फलकामुळे निर्दशनास येते आहे. या अर्धवट स्‍वरूपाच्‍या सुचनामुळे रेल्‍वे स्‍थानकावर विविध शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि रेल्‍वे सुरक्षा बल तसेच रेल्‍वे स्‍थानकावर सुरक्षेसाठी तैनात कर्मचारी यांच्‍यात वाद होत आहेत. प्रादेशिक परिवहन कर्मचारी रेल्‍वेने प्रवास करायला गेल्‍यास त्‍यांना अटकाव केला जात आहे. अनेक आरटीओ कर्मचारी रेल्‍वे स्‍थानकाच्‍या आपत्‍तकालिन सेवेत रूजु आहेत. विरोधाभास म्‍हणजे रेल्‍वे स्‍थानकावर सेवा बजावायची मात्र रेल्‍वेने प्रवास करायचा नाही असा उफरटा न्‍याय आरटीओसह विविध सरकारी कर्मचारी यांना दिला जात आहे.

मध्‍य व पश्चिम रेल्‍वेवरील विविध स्‍थानका नजिक राहत असलेल्‍या व सुचना फलकात समाविष्‍ट न केलेल्‍या सरकारी व निमसरकारी कर्मचारी यांना एसटीबसवर अवलंबुन रहावे लागत आहे. एसटीची सेवा ही पुरेशी नाही त्‍यातही महिला कर्मचारी यांना एसटीचा लांबवरचा प्रवासासाठी अनेकवेळा चार चार तास प्रवास करावा लागतो. राज्‍य शासनाच्‍या प्रादेशिक परिवहन विभागाने शंभर टक्‍के काम करण्‍याचे परिपत्रक काढले आहे ते देखील असेच हास्‍यस्‍पद ठरत आहे. रेल्‍वेने प्रवास करण्‍याची मुभा नाही त्‍यात एसटीची सेवा देखील तोकडी पडत आहे अशा स्थितीत आरटीओने शंभर टक्‍के कामकाज कसे करावे असा सवाल आरटीओतील अधिकारी कर्मचारी उपस्थित करीत आहेत. ग्रामिण व शहरी भागातील सार्वजनिक तसेच खाजगी वाहतुक व्‍यवस्‍था अजुन पुर्वपदावर आलेली नसतांना शंभर टक्‍के कामकाजाचे परिपत्रक शासन काढतेच कसे, राज्‍य शासनाच्‍या विविध विभागांमध्‍येच समन्‍वय नसल्‍याने सावळागोंधळ माजला असल्‍याचा आरोप आता होत आहे.

 527 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.