नवीन वेळापत्रकानुसार बदलापुरात दुकाने उघडणार

समविषम पद्धतीने सुरू राहणार दुकाने
बदलापूर : बदलापुर शहरात दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार सकाळी ९ ते संध्याकाळी ५ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूची दुकाने सम तारखांना व उजव्या बाजूची दुकाने विषम तारखांना सुरू राहणार असून याबाबतचा आराखडा पालिकेने जाहीर केला आहे.
बदलापूरचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी जारी केलेल्या सुधारित आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळता इतर भागात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वा. दरम्यान सम व विषम तारखांना दुकाने सुरू राहणार आहेत. कपड्याच्या दुकानात ट्रायल रूमचा वापर करण्यास बंदी असणार आहे. कपडे एक्सचेंज करण्यास व रिटर्न करण्यास बंदी असणार आहे. नोंदणीकृत परवानाधारक रेस्टॉरंट, पोळीभाजी केंद्र व हॉटेल्स सुरू राहू शकणार असली तरी त्यांना फक्त पार्सल सेवाच देता येणार आहे. अंडा ऑम्लेट, चायनीज, पाणीपुरी, पावभाजी, नाश्ता आदी खाद्यपदार्थ हातगाडीवर रस्त्यावर तयार करण्यास, विकण्यास बंदी असणार आहे. रसवंती गृहे, शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद राहणार आहेत. पानपट्टी, गुटखा, तंबाखू आदीची दुकाने बंद राहणार आहेत.
सभा मेळावे, राजकीय कार्यक्रम, उत्सव, जत्रा, यात्रा, उरूस, धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, स्पर्धा व आठवडे बाजार भरविण्यास बंदी असणार आहे. शहराच्या भागाभागात फळ व भाजी विक्रेत्यांना विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असली तरी शहरातील मुख्य बाजारपेठ मात्र बंदच राहणार आहे. हेअर कटिंग सलून, स्पा, ब्युटीपार्लर ही बंद राहणार आहेत. .
एका दुकानासमोर एकावेळी केवळ पाच ग्राहक सुरक्षित अंतर राखून उभे राहण्यासाठी मार्किंगची व्यवस्था दुकानदारांना करावी लागेल. दुकानदार व नागरिक यांनी मास्क तसेच सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक राहील. दुकानदार तसेच दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ऍप कार्यान्वित असणे आवश्यक आहे. आस्थापनेवर काम करणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे व आरोग्य विमा काढण्याची जबाबदरी संबंधित दुकानदाराची असणार आहे. दुकानदारांनी गर्दी टाळण्यासाठी टोकन सिस्टम किंवा पूर्वनियोजित वेळ ठरवण्यासारखे उपक्रम व घरपोच सेवेला प्राधान्य देण्याचीही सूचना करण्यात आली आहे.

 540 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.