कोकणासाठी तीन हजार कोटीची आर्थिक मदत द्या

पनवेल संघर्ष समितीची केंद्र सरकारकडे मागणी

पनवेल: निसर्गाने कोप धारण करून केलेल्या नृत्यतांडवामुळे कोकणाचे दशावतार सुरू झाले आहेत. या शुक्लाकाष्टात रायगडसह कोकण नेस्तनाबूत झाले आहे. त्याकरिता भरघोस आर्थिक मदतीसाठी केंद्राने तीन हजार कोटी रूपयांची तातडीने मदत पाठवावी, अशी विनवणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पनवेल संघर्ष समितीने पाठवून कोकणची व्यथा त्यांच्या कानावर घातली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी रायगडसह कोकणचा हवाई दौरा करून किमान कोकणच्या नैसर्गिक दारिद्रयाची पाहणी केल्यास आर्थिक मदतीची निकड त्यांच्या लक्षात येईल, अशीही विनंती त्यांना पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली असून त्यांचे विविध विभाग सांभाळणाऱ्या तीन मुख्य सचिवांना ही पत्र ई-मेल केली आहेत.
रायगड जिल्हा आणि कोकण किनारपट्टीवर वादळाने बागायतदार, बारा बलुतेदार, नागरिक, कोळी समाजाचे फार मोठे सामाजिक, मानसिक तसेच आर्थिक नुकसान केले आहे. त्या सर्व घटकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पहिल्या प्रयत्नात केंद्र शासनाने तीन हजार कोटी रुपयांची मदत तातडीने पाठविणे गरजेचे आहे, अशी विनंती कडू यांनी पंतप्रधानांना केली आहे.
राज्य शासनाने मदत घोषित केली असली तरी ती पुरेशी नसून संकट त्या मदतीच्या हजारोपटीने मोठे आहे. तेव्हा केंद्र सरकारने मदत केल्याशिवाय कोकण या संकटातून उभे राहील असे वाटत नाही, असे स्पष्ट चित्र असल्याने केंद्र सरकारने त्वरित मदत घोषित करून प्रत्यक्षात श्री गणेशा करावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.

 534 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.