नाही तर पुन्हा लॉकडाऊन

MissionBeginAgain जीवनघेणे ठरल्यास पुन्हा बंद करण्याचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा इशारा

मुंबई : राज्यातील जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणण्याच्यादृष्टीने मिशन बिगीन अगेन जाहीर करण्यात आले. मात्र मुंबईसह अनेक ठिकाणी शाररीक अंतर पाळले जात नाही. तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी, प्रवासात योग्य अंतर न राखणे या गोष्टी होताना दिसत आहेत. जर हि शिथीलता जीवघेणी ठरू लागली तर पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला.
निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या कोकणासाठी मदत जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावं लागणार आहे. सरकार अतिशय सावधगिरीने पावलं टाकत आहे. कुठेही घाई, गर्दी होऊ नये. ज्याप्रमाणे लॉकडाउन आपण टप्प्याटप्प्याने लागू केला. त्याचप्रमाणे शिथीलता आणत आहोत. अजूनही संकट टळलेलं नाही. अजूनही लढा संपलेला नाही. करोनासोबत लढत असताना अर्थचक्र बंद करुन चालणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
करोनासोबत जगायला शिका असं जगभरात सांगितलं जात आहे. सरकारने निर्बंध शिथील केल्यानंतर जी काही झुंबड उडाली ती पाहून थोडी धाकधूक वाटली. आरोग्यासाठी व्यायाम करायला मिळावा यासाठी बाहेर पडायची परवानगी दिली. आरोग्य खराब कऱण्यासाठी नाही. आपण एकमेकांपासून अंतर ठेवलं पाहिजे. सार्वजनिक सेवा अद्यापही सुरु केलेल्या नाहीत. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे. पण जर ही उघडीप जीवघेणी ठरते असल्याचे लक्षात आलं तर नाइलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागेल. पण महाराष्ट्रातील जनता सहकार्य करणारी आहे. जनता सरकारचं ऐकत असल्याचे त्यांनी सांगितले.
गर्दी टाळा, कोणत्याही परिस्थिती ती होता कामा नये असं आवाहन करत आपल्याला करोनासोबत जगायला शिकलंच पाहिजे. घराबाहेर पडताना मास्क वापरणे, स्वच्छता राखणे या गोष्टींचं पालन करावंच लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत मुंबईत पोहोचता यावे यासाठी लोकल सुरु करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडे आम्ही सातत्याने लोकल सुरु करण्याची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
निसर्ग वादळाने कोकणात मोठी हानी झाली आहे. मदत देण्यासंदर्भात सद्याचे निकष जून झाले आहेत. त्यामुळे या निकषात बदल करण्यात आल्याचे सांगत यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 461 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.